पर्यावरण पर्यटन चळवळीतील कार्यकर्ता हरपला
*चिपळूण :कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील आरोही संस्थेचे संस्थापक मानद वन्यजीव रक्षक, ग्लोबल चिपळूण टुरिझम चे संचालक आणि पर्यटन, पर्यावरण क्षेत्रातील खंदे कार्यकर्ते निलेश बापट यांचे वयाच्या 48 व्या वर्षी आज संध्याकाळी 6.15 चे सुमारास ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुखःद निधन झाले. उद्या सकाळी 10.00 वाजता चिंच नाका येथील घरातून अंत्ययात्रा रामतीर्थ स्मशानभूमीत निघणार आहे
कोकणामधील कडेकापारित, जंगलात फिरून निसर्गाचा, वन्यप्राण्यांचा, पक्षांचा अभ्यास करणारा निसर्गसेवक अशी नीलेशची ओळख होती. आरोही नावाच्या संस्थेच्या माध्यमातून त्याचे हे काम सातत्याने चालू होते. पर्यटन क्षेत्रात ही निलेश चे नाव आघाडीवर होते निसर्ग सहली आयोजित करून सर्वसामान्य माणसांना निसर्गाचे पैलू उलघडून सांगणे यामध्ये त्याचा हातखंडा होता. पेंच,रणथंबोर, कान्हा ताडोबा, नागझिरा,बांधवगड, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यासारख्या व्याघ्र प्रकल्पात कोकणातील पर्यटकांच्या आणि शालेय विद्यार्थ्यांच्या सहली आयोजित करण्यात निलेश आघाडीवर होता.कोकणातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील गड किल्ले आणि जंगले हा नीलेशचा अभ्यासाचा विषय असे नीलेशच्या अचानक जाण्याने कोकणातील पर्यावरण आणि पर्यटन चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. निलेश सामाजिक सेवेत सक्रिय असलेला हा मदतशील स्वभावाचा म्हणून अनेकांना परिचित होता. त्याच्या जाण्याने चिपळूणच्या सांस्कृतिक चळवळीतही एक मोठा आधारवड हरपला आहे.
ग्लोबल चिपळूणच्या दृष्टीने अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी ही दुर्दैवी घटना आहे. निलेश यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई,दोन विवाहित बहिणी असा मोठा परिवार आहे. निलेश यांनी घेतलेली एक्झिट ही सगळ्यांनाच धक्का देणारी ठरली आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक ,पर्यटन उद्योग आदी क्षेत्रातील मान्यवरांकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे.











