रत्नागिरी | प्रतिनिधी : स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फौंडेशन महाराष्ट्र आयोजित शैक्षणिक नवोपक्रम या राष्ट्रीय स्पर्धेत मराठा मंदिर अ.के.देसाई हायस्कूल. रत्नागिरीचे उपक्रमशिल शिक्षक श्री संतोष गार्डी यांच्या शिकू आनंदे संबोध भूमितीचे…या उपक्रमाची निवड झाली होती. राष्ट्रीय नवोपक्रम स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सोलापूर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये श्री संतोष गार्डी यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
श्री गार्डी यांचा सन्मान कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सारथी प्रमूख माननीय श्री अशोक काकडे साहेब यांच्या शुभहस्ते व प्रसिद्ध साहित्यिक संजय जगताप, सकाळ सोलापूर जिल्ह्याचे संपादक श्री. अभय दिवाणजी, श्री योगेश सोनवणे, बालभारती सदस्य अजयकुमार लोळगे सर.. सर फाउंडेशनचे संयोजक बाळासाहेब वाघ, श्री. सिद्धराम माशाळे, श्री. राजकिरण चव्हाण यांच्या उपस्थितीत देण्यात आला. राज्यातील नवोपक्रमशील शिक्षक ,अधिकारी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध नाविन्यपूर्ण मार्गाने प्रयत्न करीत असतात. प्रत्येक मूल वेगळ आहे अशा प्रत्येक मुलाची शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी शिक्षक सातत्याने प्रयत्न करत असतात. अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील सर्व शिक्षकांना व्हावी व देशभरात राबवलां जाणारा प्रत्येक उपक्रम शाळेपर्यंत पोहोचवावा यासाठी सर फाउंडेशन गेली अनेक वर्ष सतत प्रयत्न करीत आहे.
यानिमित्ताने संपूर्ण देशभरातील शिक्षक एकत्र येतात. उपक्रमांच्या सादरीकरणातून शैक्षणिक विचारांची देवाणघेवाण झाली. विविध शाळांमधून राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती उपस्थिती शिक्षकांना झाली. आणि यातूनच अनेक सृजनशील व्यक्तिमत्त्वांची ओळख झाली. सर फाउंडेशन मुळे आपण राबवलेल्या छोट्या उपक्रमाचे सादरीकरण राष्ट्रीय स्तरावर करण्याची संधी मिळाली. यामुळे भविष्यात यापेक्षाही उत्तम उपक्रम प्रशालेत राबवले जातील असा विश्वास श्री संतोष गार्डी यांनी व्यक्त केला. या यशाबद्दल प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रज्ञा दळी व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी, पालक, विद्यावर्धिनीचे सर्व पदाधिकारी यांनी श्री संतोष गार्डी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.











