सुशील सावंत यांनी SAVE मिऱ्या म्हणत केला डोळे उघडणारा देखावा
रत्नागिरी | प्रतिनिधी :पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या एमआयडीसी विभागने कोणतीही पूर्वकल्पना न देता मिऱ्या गावामधे एमआयडीसीसाठी वृत्तपत्रात अधिसूचनाच प्रसिद्ध केल्यानंतर मिऱ्या गावासह संपूर्ण रत्नागिरी विधानसभा मतदार संघात खळबळ उडाली आहे. मिऱ्या ग्रामस्थानी या एमआयडीसीला विरोध केला आहे. यासाठी ग्रामस्थानी एकत्र येत ठाम भूमिका मांडली. तर गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या चाकरमान्यानी सुद्धा आपल्या कुटुंबीय आणि बांधवांना ठाम पाठिंबा देतानाच या एमआयडीसीला विरोध केला. तसे फलकही गावात झळकवले गेले आहेत. ग्रामस्थांच्या विरोधाच्या भावना तीव्र असतानाच पालकमंत्री तथा या विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी मी ग्रामस्थांशी चर्चा करेन अशी भूमिका घेतली.
मात्र त्यानंतर पुन्हा एकदा मिऱ्या गावात बॅनर लावून प्रस्तावित एमआयडीसी नकोच ही भूमिका ठामपणे अधोरेखित केली. त्यानंतर पालकमंत्री सामंत यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे स्टेटमेंट आले नसताना मिऱ्या गावाचे सुपुत्र माजी आमदार बाळ माने यांनी पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सामंत यांच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केला आहे. उद्योग, प्रकल्पाची घोषणा करायची मग त्याला विरोध झाला की तो प्रकल्प रद्द करणार असे सांगत ग्रामस्थांच्या बाजूने उभे राहिल्याचे दाखवायचे अस काम पालकमंत्री करत असल्याचे श्री माने म्हणाले होते.
मिऱ्या एमआयडीसी ला इतका तीव्र विरोध असून तो थेट यंदाच्या गणेशोत्सवावरही दिसून आला. मिऱ्याचे रहिवासी सुशील सावंत यांनी त्यांच्या यंदाच्या गणेशोत्सव देखव्याची थीम SAVE मिऱ्या ही घेत आताचे निसर्गसंपन्न मिऱ्या आणि एमआयडीसी आल्यानंतरचे मिऱ्या हा फरक दाखवत डोळे उघडणारा देखावा तयार केला. या देखावयाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.











