रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून मतदारसंघातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी करणार काम
बेरोजगारांना रोजगार मिळवून देणे हेच प्राधान्य
सावंतवाडी । प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस जल्लोषत साजरा करण्यात येणार आहे. २० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर पर्यंत सावंतवाडी मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद मतदार संघामध्ये या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी दिली.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे जिल्हा कार्यकारणी सदस्य तथा माजी नगरसेवक मनोज नाईक, ॲड. अनिल निरवडेकर, माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर, बांदा माजी सरपंच अक्रम खान, नेमळे माजी सरपंच विनोद राऊळ, केतन आजगांवकर, दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, विकासातले झपाटलेपण काय असू शकते, पालक कसा असावा हे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दाखवून दिले आहे. ज्या झाडाला फळे लागतात त्याच झाडांवर दगड बसतात, हे सर्वांनाच माहित आहे. परंतु कोणाच्या टीकेची पर्वा करता “नेकी कर और दर्या मे डाल” अशा पद्धतीने विकासाकडे वाटचाल कशी करायची याचा मंत्र रवींद्र चव्हाण यांनी आपल्या वाटचालीतून दिला आहे. याच मंत्रजपातून माझी आजची समाजसेवेची साधना सुरू असून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात काम करत असताना मी लोकांचे अपार प्रेम अनुभवतो. त्यातून मिळणारे समाधान हीच या मंत्रजपाच्या साधनेतून मिळालेली फलश्रुती आहे, असे मी मानतो, असे ते म्हणाले.
गणेशोत्सवात माझ्या दोडामार्ग भेटीच्या वेळी एका वृद्ध काकांनी डोळ्यात पाणी आणून मला तो किस्सा सांगितला की एका अपघातात एका माणसाचा मृत्यू झाला. पोस्टमार्टम नंतर त्याचा मृतदेह शिवण्यासाठी आरोग्य विभागाकडे साधा धागाही नव्हता. त्या माणसाची मुलगी मुंबईतून येईपर्यंत तो मृतदेह खळ्यात तसाच ठेवण्यात आला होता. तो प्रसंग कधीच डोळ्यासमोरून गेला नाही, ती मनाला आलेली अस्वस्थता आजही कायम आहे. त्यामुळे सावंतवाडी मतदार संघातील लोकांसाठी आरोग्याच्या सुविधांचा प्रश्न अत्यंत चिंताजनक आहे हे अनेकदा जवळून अनुभवलं. त्यामुळे या विषयासाठी भविष्यात काय करायचे याच्या अनेक गोष्टी मनात निश्चित केल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.
मी बोलणारा माणुस नाही तर करून दाखवणारा माणूस आहे. या मतदारसंघात आजवर अनेकांचे अनेक संकल्प घोषित झाले असतील. ते संकल्प म्हणजे मी त्या त्या ज्येष्ठ व्यक्तींच्या भावना मानतो, आणि ज्येष्ठांच्या भावनांची आणि संकल्पनांची परिपूर्ती करणे ही युवकांची जबाबदारी असते. सावंतवाडीकर जनतेच्या हितासाठी असलेले सर्व संकल्प परिपूर्ण करण्यासाठी मी माझ्या परीने जास्तीत जास्त प्रयत्न करत आहे. त्या प्रयत्नांना जनता जितके जास्त बळ देईल तितक्या वेगात या मतदारसंघातील सर्व युवकांना सोबत घेऊन मी ज्येष्ठांच्या संकल्पांची पूर्ती संकल्प निश्चितपणे करेन.
अशा समाजहिताच्या मार्गावर न डगमगता अविरतपणे चालण्याची प्रेरणा देणाऱ्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण या दूरदृष्टीच्या नेतृत्वाला मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो, अशा शब्दांत त्यांनी सदिच्छा दिल्या.








