सावंतवाडी शहर भाजपची कार्यकारिणी जाहीर
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहर भाजपच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष अजय गोंदावळे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. तसेच शहर महिला मोर्चा अध्यक्षपदी मोहीनी मडगावकर तर प्रभारीपदी उत्कर्षा सासोलकर यांची निवड करण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सरचिटणीस महेश सारंग यांच्या शिफारशीनुसार ही कार्यकारिणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांनी जाहीर केली. भाजपच्या सावंतवाडी शहर मंडला अध्यक्षपदी गेल्या काही वर्षात केलेल्या उत्कृष्ट कामामुळे अजय गोंदावळे यांची फेर निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी माजी नगरसेवक गुरूदास मठकर, सत्यवान बांदेकर, अनिल सावंत, मयुर लाखे, संदेश टेमकर तर सरचिटणीस विनोद सावंत, परिक्षित मांजरेकर यांची निवड करण्यात आली आहे. संजय वरेरकर, कृष्णा लाखे चिटणीस तर सोशल मीडिया प्रमुखपदी किशोर चिटणीस नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच निमंत्रित सदस्य पदी कुणार शृंगारे, निशिकांत तोरसकर, आनंद नेवगी, राजू बेग, यशवंत कोरगावकर, उदय नाईक, ॲड. परिमल नाईक, सुधीर आडिवरेकर, नासीर शेख, समृद्धी विर्नोडकर, दिपाली भालेकर यांची निवड जाहीर करण्यात आल्याचे भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांनी सांगितले.
दरम्यान, शहर भाजपच्या प्रवक्तेपदी केतन आजगावकर यांच्या ॲड. संजू शिरोडकर तर प्रभारी महिला अध्यक्षा म्हणून अनुभवी माजी नगरसेविका उत्कर्षा सासोलकर यांना संधी देण्यात आल्याची माहिती संजू परब यांनी दिली. सावंतवाडी मतदारसंघात काहींना आमदार व्हायचे आहे. जनतेच्या जमिनी घेऊन त्या गोरगरिबांचे पैसे काही जणांकडून ठेवले जात आहेत. असे लोक आमदार होण्याची स्वप्न बघत आहेत. मात्र, अशा लोकांना आमदारकी सोडाच पण तिकीटही मिळणार नाही त्यामुळे अशा लोकांपासून जनतेन सावध रहावे. त्यांचे नाव व प्रताप भविष्यात पुराव्यासकट व त्या गोरगरिबांना सोबत बसवून जाहीर करेन , असा इशारा यावेळी संजू परब यांनी दिला आहे.
दरम्यान, शहरातील एका डाटा कंपनीकडून त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार थकविले आहेत.यासंदर्भात कर्मचाऱ्यांनी आवाज उठवला आहे. यातील काही कर्मचाऱ्यांनी माझी देखील भेट घेतली असून आपले गाऱ्हाणे मांडले आहे. त्यामुळे संबंधित कंपनीने तात्काळ कर्मचाऱ्यांचे पगार द्यावे अन्यथा आपण सदर कंपनीचे कार्यालय फोडू, असा इशारा देखील यावेळी संजू परब यांनी दिला. यावेळी भाजपचे शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, महिला शहर अध्यक्षा मोहीनी मडगावकर, परिक्षित मांजरेकर, विनोद सावंत, क्लेटस फर्नांडिस आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.











