वैभववाडी l प्रतिनिधी : नाधवडे व्हेळकरवाडी येथील शेतकरी रमेश तुकाराम पाष्टे वय ६४ यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
रमेश पाष्टे मंगळवारी शेतात काम करायला गेले होते. काम करीत असताना त्यांना सर्पदंश झाला. घरी आल्यावर त्यांनी त्याबाबत माहिती दिली. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना तिथून जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. जिल्हा रुग्णालयात ही त्यांची प्रकृती स्थिर होत नसल्याने त्यांना बांबोळी गोवा येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, सून, जावई, असा परिवार आहे.











