मालवण | प्रतिनिधी : अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांनी विशेष पथकांची नियुक्ती केली आहे. पथकातील नायब तहसीलदार श्रद्धा चौगुले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मालवण सागरी महामार्ग येथे दोन ब्रास वाळूची अनधिकृत वाहतूक करणारा डंपर पकडला. पुढील कारवाईसाठी डंपर तहसील कार्यालयात जप्त करून ठेवला आहे. कुडाळ येथील हा डंपर असल्याची माहिती समोर आली असून सोमवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.
महसूल विभागाकडून कारवाई होत असल्याची माहिती मिळताच सागरी महामार्गावरील डंपर वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती.
गेले अनेक दिवस तालुक्यात बेकायदेशीर वाळू वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारी वाढल्याने महसूल विभागाकडून कारवाईत वाढ केली आहे.
सोमवारी नायब तहसीलदार चौगुले यांच्या पथकाकडून करण्यात येत असलेल्या तपासणीत सागरी महामार्ग याठिकाणी डंपर वाळूची वाहतूक करत असताना सापडून आला. त्याच्याकडे वाळु वाहतूक पासची मागणी केली असता पास सापडून आला नाही. डंपर क्रमांक (एमएच-०७-सी-५८९०) हा जप्त करून तहसील कार्यालयात ठेवण्यात आला आहे. या कारवाईची माहिती मिळताच तहसीलदार वर्षा झालटे यांनी भेट देऊन पुढील कारवाईच्या सूचना केल्या. या कारवाईत मंडळ अधिकारी पिटर लोबो, तलाठी गौरव दळवी, पेंडूर तलाठी आणेराव तसेच इतर अधिकारी सहभागी झाले होते.











