सर्जेकोट येथील 40 गिलनेट धारक मच्छीमारांची मासेमारी जाळी तोडली
90 लाख नुकसान ; मच्छिमार संतप्त
मालवण | प्रतिनिधी : मालवण किनारपट्टीवर परराज्यातील हायस्पीड बोटींनी धुमाकूळ घातला आहे. मोठया प्रमाणात मासळीची लूट करताना स्थानिक मच्छिमारांच्या समुद्रातील जाळ्यांचे मोठे नुकसान केले जात आहे. सर्जेकोट परिसरातील सुमारे ४० गिलनेट धारक मच्छीमारांच्या मासेमारी जाळ्यांचे हायस्पीड ट्रॉलर्सनी सुमारे ९० लाख रूपयांचे नुकसान केले आहे. आक्रमक मच्छीमारांनी सोमवारी मत्स्य व्यवसाय विभागावर धडक देत सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर यांची भेट घेत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्तीनौकेच्या वेगाची मर्यादी कमी असल्याने हायस्पीड बोटींवर कारवाई करणे शक्य होत नसल्याने मच्छीमारांच्या हातातोंडाशी आलेला मत्स्य घास हायस्पीड बोटी हिरावून घेत आहेत. मत्स्य विभागाने कडक कारवाई करून मच्छिमारांना न्याय द्यावा.
अन्यथा मच्छीमारांच्या मदतीने मत्स्य व्यवसाय विभागाने हायस्पीड ट्रॉलर्स पकडण्याची मोहिम हाती घ्यावी. अशी भूमीका मच्छीमार नेते कृष्णनाच तांडेल व सर्जेकोट येथील मच्छीमारांनी घेतली.
मच्छीमारांच्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात येईल, हायस्पीड गस्तीनौका लवकरात लवकर मालवण बंदरात दाखल होणार आहे. मच्छीमारांनी मत्स्य व्यवसाय विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्तांनी यावेळी केले.
यावेळी सर्जेकोट येथील मच्छिमार नितीन परुळेकर, संतोष परब, राजा देऊलकर, दाजी खडपकर, नाना सावजी, प्रेमानंद कांदळगावकर, प्रशांत पराडकर, लवू सावजी, नारायण आडकर, कैलास मुंबरकर, आबा सावंत, लक्ष्मण खडपकर, दिपक जामसंडेकर, तेजा तांडेल, प्रतिभा पराडकर, तुषार केळुसकर, विकास परुळेकर, नारायण पराडकर, सुदेश जामसंडेकर, महेश पराडकर, अंकुश सावजी, महादेव कुर्ले आदी मच्छीमार यावेळी उपस्थित होते.
मालवण समुद्रात मासेमारी करीत असताना आमच्या समुद्रात टाकलेल्या जाळ्यांरून परराज्यातील हायस्पीड बोटी गेल्याने जाळ्यांचे नुकसान झाले आहे. हायस्पीड ट्रॉलर्सना जाब विचारल्यावर त्यांनी लोखंडी बोटीने आमच्या बोटी फोडण्याची धमकी देतात, समुद्रात चाल करून येतात. मागील पाच दिवसांपासून आम्ही मासेमारी करण्यास जात नाही. परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्स गोवा, कर्नाटक, केरळ, गुजरात राज्यातून येतात आणि किनाऱ्यापासून ११ ते १२ वाव खोल समुद्रातही मासेमारी करतात. त्यामुळे आमच्या जाळ्यांचे नुकसान होवून आर्थिक फटका बसत आहे. गरीब मच्छीमारांना यातून मार्ग काढीत व्यवसाय करणे पूर्णतः अशक्य झाले आहे. शिवाय आमच्या बोटींवर हायस्पीड बोट चढवून फोडल्यास सर्व खलाशांचे प्राण जाण्याची भीती निर्माण झाली आहे. सदरची भयानक परिस्थिती मागील पाच वर्षांपासुन चालली आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे गरीब मच्छीमार आर्थिक संकटातून जात आहे. १९८९-९० साली महाराष्ट्र शासनाने रात्रीच्यावेळी गिलनेट पद्धतीने
मासेमारी करणाऱ्या सामान्य मच्छीमारांच्या व्यवसायाला संरक्षण देण्यासाठी संध्याकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ट्रॉलनेटद्वारे मासेमारी करायची नाही. असा शासकीय नियम केलेला होता. पण दुदैवाने त्या नियमाची अजिबात अंमलबजावणी केली जात नाही. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी १ ऑक्टोबर पासून आपल्या कार्यालयाबाहेर बेमुदत साखळी उपोषण करणार आहोत, असे म्हटले आहे.
हायस्पीड बोटींमुळे आम्हाला व्यवसाय करणे कठीण झालेले आहे. मासेमारी बोटी मच्छीमारी करण्यासाठी नेतानाही मनात मिती निर्माण होत आहे. हायस्पीट बोटी कधीही अंगावर येण्याची भिती असते. यामुळे मत्स्य व्यवसाय विभागाने मच्छीमारांच्या बोटींचे सहकार्य घेवून हायस्पीड बोटींवर कारवाई करावी. वेळ आली तर आमच्या बोटींचे नुकसान झालेले चालेल पण उपासमार आम्ही पाहू शकत नाही. आम्हाला समुद्रात पोहण्याची सवय आहे, आम्ही समुद्रात दोन ते तीन बोटी निश्चीतच पकडू शकतो, असेही श्री. तांडेल यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्हयासाठी हायस्पीड गस्तीनौका मंजूर होवून मिळालेली आहे. सदरचे नौका काही दिवसात सिंधुदुर्ग बंदरात येणार आहे. आमच्याकडून हायस्पीड बोटीं पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या कार्यरत असणारी गस्तीनौका हायस्पीड बोटी पकडू शकली नाही तर पळवून लावण्याचा प्रयत्न तरी करत आहे. काही दिवसांपुर्वी आमच्या बोटीवर काही हायस्पीड बोटी चालून आल्या होत्या, मात्र शस्त्रधारी पोलीस पाहून या बोटींनी आपली जाळी टाकून पळ काढला होता. यामुळे आम्हीही हायस्पीड बोटीच्या प्रतिक्षेत आहोत. मच्छीमारांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येवून त्यांना शासन स्तरावरून मदत मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही सहाय्यक आयुक्तांनी स्पष्ट केले.
मालवण तालुक्यात सध्या केरळीयन बोटींवरील मासे मोठ्या प्रमाणात आणले जात आहेत. यासाठी काही व्यक्ती कमिशनसाठी या बोटींचा वापर करत आहेत. काही वर्षांपुर्वी केरळीयन बोटींची तपासणी करण्यात आलेली होती. सध्या मालवण समुद्रात केरळीयन बोटींवरील मासे कमिशनच्या आशेपोटी घेवून विक्रीसाठी बंदरात आणले जात आहेत. यामुळे भविष्यात स्थानिक मासेमारी पूर्णपणे बंद होवून केरळीयन बोटींच्या ताब्यात मासेमारी जाण्याची भिती आहे. यामुळे अशापद्धतीने बाहेरील मासे मालवण बंदरात आणले जात असल्यास त्यावरही कारवाई करण्याची मागणी यावेळी मच्छीमारांनी केली.












