करुळ येथे अतिवृष्टीत भातशेती जमिनदोस्त

चार काॅजवे भरले गाळाने : वाड्यांचा संपर्क तुटला

वैभववाडी | प्रतिनिधी :
सोमवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका करुळ गावाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. मंगळवारी काॅजवेवरुन पाणी जात असल्याने तीन वाड्याचा संपर्क तुटला होता. जेसीबीच्या साह्याने काॅजवेतील गाळ उपसण्याचे काम दिवसभर सुरू होते. नाचणी व भात शेतीला देखील या अतिवृष्टीचा फटका बसला आहे.

सोमवारी सह्याद्रीच्या पट्ट्यात मोठा पाऊस झाला. या पावसाने करूळ घाटात ठीक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. तसेच घाटातील चिखल माती दिंडवणेवाडी व भट्टीवाडी व्हाळातून वाहून आल्याने चार काॅजवे भरून गेले होते. पाणी रस्त्यावरून वाहत होते. करूळ दिंडवणेवाडी, भट्टीवाडी, खडकवाडी व गावठाण ब येथील काॅजवे पाण्याखाली गेले. चारही वाड्यांचा संपर्क मंगळवारी दिवसभर तुटला होता. तसेच भात शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महसूल विभागाकडून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.