लांजा खेरवसे जाधववाडी येथील बुधवारी रात्रीची घटना
लांजा (प्रतिनिधी) टेम्पोतून विनापरवाना गुरांची वाहतूक केल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी धुंदरे येथील एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी २५ सप्टेंबर रोजी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास खेरवसे जाधववाडी येथे प्राणीमित्रांचे सहकार्याने ही
गुरांची वाहतूक पकडण्यात आली
याबाबतची फिर्याद श्रेयस आनंद शेट्ये (राहणार लांजा रेस्ट हाऊस) यांनी दिली होती. श्रेयस
शेट्ये हे प्राणी कायदा (असं) नियंत्रण, मानद प्राणी कल्याण अधिकारी म्हणून काम करतो. आसगे टोळेवाडी येथून गुरांची बेकायदा वाहतूक केली जात असल्याची खबर त्यांना मिळाली होती. त्यानुसार शेट्ये व सहकारी कार्यकर्ते यांनी बुधवारी २५ सप्टेंबर रोजी रात्री खेरवसे -आसगे-केळंबे रस्त्यावर पाळत ठेवली होती.रात्री ८.४५ वाजता एम एच ०८ एपी ४२३४ या क्रमांकाच्या टेम्पो खेरवसे जाधववाडी येथे प्राणीमित्रांनी थांबवला. हा टेम्पो समीर किसन खानविलकर (राहणार पानगलेवाडी, लांजा) चालवित होता. तर ही गुरे बाबल्या पांडुरंग लांबोर (राहणार धुंदरे कालभैरव नगर) याने आसगे येथून खरेदी केली होती. प्राणीमात्रांनी या दोघांना ताब्यात घेऊन लांजा पोलिसांना याबाबची माहिती दिली.
बेकायदा व विनापरवाना गुरांची वाहतूक केल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११(१) , (ध), (ड), (च), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९८१ चे , ११९ मोटार वाहन कायदा कलम ६६/१९२, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३ (५) क्रमाने बाबल्या लांबोर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.










