बांदा : प्रतिनिधी : डिंगणे गावचे माजी सरपंच तथा लाकूड व्यापारी दत्ताराम बाळु शेटकर यांचे आज सकाळी गोवा येथील रेडकर हॉस्पिटल मध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे मुळ गाव आंबेली (ता. दोडामार्ग) आहे. ते परिसरात शेटकर भावोजी म्हणून परिचित होते.
त्यांचा लोकसंपर्क चांगला होता. त्यामुळे त्यांनी मित्रपरिवार जोडला होता. राजकारणात देखील त्यांचे सर्वपक्षीय मित्र होते. सरपंच असताना त्यांच्या कालावधीत गावात अनेक विकासकामे पूर्णत्वास आली. गेले काही वर्षे ते आजाराने त्रस्त होते. त्यांचेवर गोव्यातील रेडकर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु होते. आज सकाळी साडेसहा वाजता उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या मागे पत्नी, विवाहित मुलगी, जावई असा परिवार आहे. डिंगणे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य जयेश सावंत यांचे ते भावोजी होत.
भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, माजी आमदार राजन तेली, माजी जिल्हा परिषद सभापती प्रमोद कामत, पंचायत समिती माजी सभापती शीतल राऊळ, भगवान देसाई, मंदार कल्याणकर यांच्यासह सर्वच राजकीय पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.












