वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाचे पुरस्कार जाहीर 

 

 

२७ रोजी संघाच्या सर्वसाधारण सभेत पुरस्काराचे होणार वितरण 

वैभववाडी l प्रतिनिधी :       वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघामार्फत विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण करणाऱ्या व्यक्तींना दिले जाणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांचे वितरण संघाच्या शुक्रवार दि. २७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सभेमध्ये सन्मानपूर्वक वितरित करण्यात येणार आहे. अशी माहिती संघाचे चेअरमन प्रमोद रावराणे यांनी दिले आहे.

तालुका संघामार्फत गेले अनेक वर्ष तालुक्यात शेती पशुसंवर्धन व इतर क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येतो.

सन २०२३ -२४ साठी उत्कृष्ट भात पीक उत्पादक शेतकरी म्हणून श्री आत्माराम अच्युत खाडये रा. (नानिवडे), काजू पीक शेतकरी श्री हिंदुराव श्रीधर पाटील रा. (करूळ), ऊस उत्पादक शेतकरी श्री मोहन सखाराम रावराणे रा.(आचिर्णे ), प्रयोगशील शेतकरी श्री रविंद्र सुदाम गावडे रा. (नापणे), पशुपालक शेतकरी रवींद्र सूर्याजी साळुंखे रा. (कुसुर ) तर भरड धान्यामध्ये नाचणी पीक सतत तीन वर्ष घेतलेल्या कन्यारत्न उत्पादक महिला समूह (नावळे ) या महिला बचत गट यांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त झालेले खांबाळे गावचे सुपुत्र मंगेश कदम यांचाही यावेळी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

तालुका खरेदी विक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन वैभववाडी येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली असून संघाच्या सर्व सभासदांनी सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन चेअरमन प्रमोद रावराणे यांनी केले आहे.