रुग्णसेवेच्या कार्यात विशाल परब यांनी उचललेले पाऊल प्रेरणादायी : रवींद्र चव्हाण

सावंतवाडी मतदारसंघासाठी सहा रुग्णवाहिकांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या युती सरकारला आशीर्वाद असू द्या

सावंतवाडी । प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सेवा बळकट होण्यासाठी पालकमंत्री या नात्याने मी सुरुवातीपासूनच प्रयत्नशील आहे. जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेज तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला जनरिक मेडिसिन उपलब्ध करून देण्यात आले. रुग्णसेवेच्या या कार्यात सावंतवाडी तालुक्यात सहा रुग्णवाहिका उपलब्ध करून भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी पुढचे मोठे पाऊल टाकले आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी काढले.

भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ६ रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सावंतवाडीतील मोती तलावालगत शिवराम राजे भोसले पुतळ्यानजिक भव्य कार्यक्रमाद्वारे संपन्न झाला.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, गोवा मांद्रेचे आमदार जीत आरोलकर, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब, सौ. वेदिका परब, ॲड. अनिल निरवडेकर, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, जिल्हा परिषदच्या माजी सभापती शर्वाणी गांवकर, माजी जि प सदस्या निकिता जाधव, प्रभाकर परब, प्रयास भोंसले, माजी नगरसेवक राजू बेग , मनोज नाईक, सुधीर आडिवरेकर , दिपाली भालेकर , विकास परब , विनोद राऊळ, अक्रम खान, अमित परब , बंटी पुरोहित , दिलीप भालेकर , केतन आजगांवकर आदींसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रम राबवावे असा आग्रह धरला होता. या पार्श्वभूमीवर विशाल परब यांच्या माध्यमातून माझ्या वाढदिवसानिमित्त रुग्णसेवेच्या माध्यमातून रुग्णवाहिका उपलब्ध करून राबविलेला सेवाभावी उपक्रम निश्चितच स्तुत्य व प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार देखील पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी काढले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्य देवेंद्र फडणवीस व अजित दादा पवार नेतृत्वातील महायुतीचे सरकार राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी नेहमीच कार्यशील राहिले आहे. राज्यातील माता-भगिनींसाठी लाडकी बहीण योजना तसेच अन्नपूर्णा योजना व सर्वसामान्य महिला भगिनींसाठी केंद्राची उज्वला गॅस योजना या सर्व योजनांच्या माध्यमातून महिलांच्या उत्कर्षासाठी प्रयत्न केले जात आहेत. हे सरकार सर्वसामान्य जनतेचे सरकार असून यापुढेही या सरकारला आपले असेच आशीर्वाद मिळू द्या असे आवाहन यावेळी रवींद्र चव्हाण यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ॲड. अनिल निरवडेकर यांनी रुग्णवाहिका लोकार्पणामागील पार्श्वभूमी विषद केली. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून आपल्या जिल्ह्यातील आरोग्य सेवा उत्तम दर्जाची होण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण कार्यरत आहेत. त्यांच्याच या कार्यातून प्रेरणा घेऊन सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला उत्तम आरोग्य सेवा मिळावी व त्यांचे जीवनमान उंचवावे यासाठी विशाल परब प्रयत्नशील आहेत. याचाच एक भाग म्हणून सावंतवाडी मतदारसंघातील तीन शहरे व ग्रामीण भागांसाठी या रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हे कार्य यापुढेही असेच सुरू राहील , असे यावेळी ॲड. अनिल निरवडेकर यांनी स्पष्ट केले.

आपण जगूया दुसऱ्यांनाही जगू देऊया हा मूलमंत्र घेऊन कार्य : विशाल परब

आज लोकार्पण होत असलेल्या रुग्ण वाहिकांच्या माध्यमातून हजारो गोरगरीब जनतेचे प्राण वाचविण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळेच हा कार्यक्रम आम्ही भव्य दिव्य केला. आपण जगूया व दुसऱ्यांनाही जगू देऊया हा मूलमंत्र घेऊन आम्ही काम करीत आहोत. याच प्रेरणेतून हा कार्यक्रम होत आहे. आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा दिवस आहे. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. जनतेची सेवा करण्याचे ब्रिद घेऊन मी कार्यरत आहे व ही सेवेची संधी मला कायम मिळो हीच माझी इच्छा आहे, असे मनोगत भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आपल्या प्रास्ताविकात केले. यावेळी त्यांनी उपस्थित प्रचंड जनसमुदायाचे आभार मानले.