सावंतवाडी मतदारसंघातून नागरिकांच्या २०८ तक्रारी

 

स्थलांतर रोखण्यासाठी रोजगार निर्मितीचा प्रयत्न

पालकमंत्री तथा सार्व. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण.

सिंधुनगरी | प्रतिनिधी : सावंतवाडी विधानसभा मतदार संघाच्या जनता दरबारात आज २०८ तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यांच्यावर योग्यती कार्यवाही केली जाणार आहे. मागील जनता दरबारात ३५८ अर्ज आले होते त्यापैकी २०० हून अधिक अर्जांच्या निराकरण करण्यात आले असल्याचे सांगत जिल्ह्यातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबध्द आहे. जिल्ह्यातील नागरिकांचे कामासाठी होत असलेले स्थलांतर थांबविण्यासाठी जिल्ह्यातच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आपले प्रयत्न असल्याची माहिती पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज जनता दरबारानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

 

येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचा जनता दरबार पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आ. राजन तेली आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले की, शासन कोणत्या जिल्ह्यात कोणता विकास करणे गरजेचे आहे ? हे अभ्यासून त्यानुसार विकासावर भर देत आहे. त्याप्रमाणे सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. त्यासाठी पर्यटन विकासासाठी भर देवून रोजगारासाठी येथून होणारे स्थलांतर रोखण्यासाठी भर देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील स्वच्छ्ता अबाधित राखतानाच आरोग्य सुविधा मजबूत केल्या जातील. तसेच धार्मिक पर्यटनावर भर दिला जाईल, अशी माहिती पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

 

जिल्ह्यात पर्यटन बरोबरच औषध उपचारासाठी पर्यटक येथील अशा आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत असे सांगत हा विकास करताना रोजगारासाठी जिल्ह्यातून होणारे स्थलांतर रोखण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे यावेळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.