खेड(प्रतिनिधी) खेड नगर परिषदेत प्रभारी मुख्याधिकाऱ्यांचा यापूर्वी सुरू असलेला प्रकार महादेव रोडगे यांच्या कायमस्वरूपी नियुक्तीने संपुष्टात आला आहे. मात्र लेखापाल पद प्रभारी होते. अखेर येथील नगर परिषदेत कायमस्वरूपी लेखापालाची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे आर्थिक बाबतीतील प्रशासकीय कामांना गती मिळणार आहे.
चार महिन्यांपूर्वीच येथील नगर परिषदेत सेवा बजावणाऱ्या महादेव रोडगे यांची कायमस्वरूपी मुख्याधिकारीपदी नियुक्ती करण्यात आल्याने प्रभारींचा पदा चा प्रश्न संपुष्टात आला. यापूर्वी येथील नगर परिषदेत लेखापाल देखील प्रभारी होते. प्रभारी लेखापाल मोजकेच एक-दोन दिवस येथील नगर परिषदेत येत होते. यामुळे ठेकेदारांची बिले रखडत होती. याशिवाय आर्थिक बाबतीतील प्रशासकीय कामांचा देखील खोळंबा होत होता. अखेर नगर परिषदेत हृदय आग्रे यांची कायमस्वरूपी लेखापाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे प्रभारी लेखापालांच्या प्रक्रियेला पूर्णविराम मिळाला आहे.
खेड नगर परिषदेतील कारभार संगणक प्रणालीद्वारेच हाकला जात आहे. मात्र प्रणालीमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यास कामांचा खोळंबा होत होता. यासाठी खासगी तंत्रज्ञाना पाचारण केले जात होते. यात वेळेचा अपव्यय होवून कामेही रखडत होती. अखेर येथील नगर परिषदेत रोहिणी कांबळे यांची संगणक अभियंता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळेही प्रशासकीय कामांना गती येणार आहे.











