खेड(प्रतिनिधी) १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या दरम्यान महिनाभर विविध राष्ट्रीय पोषण आहाराचे कार्यक्रम व अभियान राबविण्यात येतात. या पार्श्वभुमीवर खेड तालुक्यातील ग्रामपंचायत घाणेखुंट,सरपंच, उपसरपंच,सर्व सदस्य, अंगणवाडी सेविका, मदतनीस, अशा सेविका, सर्व बचत गट व महिला वर्ग यांच्या सहकार्यातून पौष्टिक आहार प्रदर्शन, आरोग्य तपासणी व कुपोषण यांवर मार्गदर्शनपर कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता.तसेच जनजागृतीपार प्रचार व प्रसार फेरी काढण्यात आली.
पोषण आहार कार्यक्रमामध्ये ११० महिला, किशोरवयीन मुली, स्तनदा माता, गरोदर माता, बचत गट प्रतिनिधीनी सहभाग घेतला.हातात जनजागृती चे बॅनर व संदेश फलक घेऊन घोषणा देत गावात प्रसार फेरी काढण्यात आली.परशुराम हॉस्पिटल च्या माध्यमातून महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
डॉ. वैभवी अलमान यांनी आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या अन्न घटकांबाबत आणि पदार्थांबाबतचे मार्गदर्शन केले.अंगणवाडी सेवकांनी ‘स्त्री सबलीकरण’ या विषयावर मंगळागौर, तर गावातील तरुणांनी कुपोषण या विषयावर प्रबोधन पर पथनाट्य सादर केले.
पौष्टिक आहार प्रदर्शनामध्ये महिलांनी पौष्टिक आहार बनवून आणले होते.यामध्ये रानभाज्या, तृणधान्य, फळे, कंदमुळे व मोड आलेले कडधान्ये यांचा समावेश दिसला. ग्रामपंचायतीच्या ९ थीम पैकी २ आरोग्यदायी व बालस्नेही गाव याला प्राधान्य देत महिलांना कुपोषणमुक्त व सुदृढ गाव करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले











