लांजा तालुका काँग्रेसचा इशारा, मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर
लांजा (प्रतिनिधी) विकास कामांची निविदा प्रसिद्ध करून दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी ती अद्यापही उघडली गेली नसल्याने त्याबाबत कार्यवाही करावी, अन्यथा या विरोधात २ ऑक्टोबर रोजी उपोषणास बसण्याचा इशारा लांजा तालुका काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे .
याबाबतचे निवेदन आज सोमवारी ३० सप्टेंबर रोजी तालुका काँग्रेसच्या वतीने लांजा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी हर्षला राणे यांना सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, आपण नगरपंचायतीच्या अखत्यारीत विकास कामांची निविदा काढली होती. निविदा २० जुलै २०२४ रोजी प्रसिद्ध झाली होती. तर विकास कामांची निविदा उघडण्याची अंतिम तारीख २ ऑगस्ट होती .तरी दिलेल्या तारखेपासून आतापर्यंत निवीदा उघडण्यात किंवा संबंधित ठेकेदारांना वर्क ऑर्डर देण्यात आलेली नाही. दोन महिन्यांचा कालावधी होत आला तरी देखील आपल्या स्तरावर योग्य तो निर्णय होऊन सुशिक्षित बेरोजगार ठेकेदारांना हाताला काम मिळालेले नाही .
म्हणूनच आपण निविदा उघडण्याचा निर्णय न घेतल्यास २ ऑक्टोबर या गांधी जयंती दिनी उपोषणास बसण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. याबाबत प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी अन्यथा उपोषणाला बसण्याचा इशारा काँग्रेसचे लांजा तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण हेगिष्ट्ये , शहराध्यक्ष रवींद्र राणे, उप तालुका अध्यक्ष मकरंद जोशी यांनी दिला आहे.











