वेंगुर्ले : दाजी नाईक : सर्व मंगल मांगल्ये…
शिवे सर्वार्थ साधिके…
शरण्ये त्रंबके गौरी….
नारायणी नमोस्तुते…
वेंगुर्ले गावची ग्रामदेवता श्री देवी सातेरी मंदिरात नवरात्रोत्सव पारंपारिक पध्दतीने साजरा होतो. नऊ दिवस श्री देवीच्या नऊ रूपाचे दर्शन, आकर्षक सजावट, पुष्पपुजा, संपुर्ण मंदिरास विद्युत रोषणाई, देवीचा नैवेद्य, गाऱ्हाणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिध्द भजनी मंडळांचा बहारदार भजनांचा कार्यक्रम अशा विविधरंगी कार्यक्रमाने मंदिराचा परिसर भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघतो. भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी या देवीची ख्याती असल्याने देवीच्या दर्शनासाठी नेहमीच भाविकांची गर्दी असते.
वेंगुर्लाची ‘ग्रामदेवता’ श्री देवी सातेरी मंदिरात ‘नवरात्रोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा होतो. त्या निमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम साजरे होतात.
पहिल्या दिवशी घटस्थापना झाल्या पासून नऊ दिवस रोज संध्या ५ ते रात्रौ १२ वाजेपर्यंत अभंग, भक्तीगीत गायन, संगित, वारकरी भजन, आरती आदी कार्यक्रम नित्य नियमाने होत आहेत. गुरूवार १० ऑक्टोबर रोजी रात्रौ ११ वाजता मंदिराभोवती दिंडी प्रदक्षिणा नंतर महाआरती व तिर्थप्रसाद होणार आहे. शुक्रवार ११ ऑक्टोबर ला सकाळी १० वा नवचंण्डी होमहवन व पुर्णाहुती उत्सवाची सांगता होणार आहे.
*भक्तांच्या हाकेला धावून येणारी वेंगुर्लाची ग्रामदेवता श्री सातेरी देवी*
भक्तांच्या हाकेला धावून येणारी आणि नवसाला पावणारी अशी ख्याती वेंगुर्ल्याची ग्रामदेवता श्री सातेरीदेवीचा आहे.
वेंगुर्ला येथे विराजमान झालेली माता श्री सातेरीदेवी ही कोकणातील जागृत देवतांपैकी एक ओळखली जाते. देवाला आपल्या भक्तांविषयी किती कळकळ असते त्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे भक्तांच्या हाकेला धावून जाणारी श्री सातेरी देवी आणि पंचायतन. या देवीची मूळ भूमिका ही अणसूर येथे होती़; पण आपल्या भक्तांच्या हाकेपोटी तिला येथे प्रकट व्हावे लागले. या गावात फार वर्षापूर्वी प्रभू नावाचा तिचा भक्त रहायचा. त्याची अणसूरच्या सातेरी मातेवर फार श्रद्धा होती. तो न चूकता त्या गावात जावून मातेची सेवाचाकरी करीत असे. मातेचे दर्शन केल्याविना त्याचा दिवस जात नसे. त्याचा हा नित्यक्रम तो न चुकता पार पाडत असे. जसजसे दिवस वाढत गेले, तसे त्याचे वयही वाढत गेले. त्यामुळे त्याच्या या नित्यक्रमात व्यत्यय येऊ लागला. त्याचे त्याला फार दुःख: वाटू लागले. व्याकुळ मनाने त्याने मातेला साद घातली आणि तिची सेवा करण्यात येणार्या व्यत्ययाविषयी क्षमा मागितली. आपल्या भक्ताची अशी केविलवाणी अवस्था त्या मातेला सहन झाली नाही. तिने आपल्या भक्ताला दृष्टांत देऊन सांगितले की, ‘मी वारूळ रुपातून तुझ्या गावात अवतरीत होईन’. तिच ही आदीशक्ती माता सातेरी देवी. आता या मातेचे भव्य असे मंदिर बांधण्यात आले असून वेंगुर्ल्याची ग्रामदेवता म्हणून या मातेकडे पाहिले जाते. येथील वैशिष्ट्य म्हणजे या मातेची वर्षातून दोनदा म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा आणि माघ पौर्णिमा या तिथिला दोन वेळा वार्षिक जत्रा भरते.
*मंदिरात आज किरणोत्सव.. आणखी एक वैशिष्ट्य*
वेंगुर्ले गावची ग्रामदेवता श्री देवी सातेरी मंदिरात अभुतपुर्व असा सोहळा सुर्यनारायण थेट देवीच्या भेटीस येण्याचा सोहळा असतो. भक्तांना याची देही याची डोळा तो पाहण्याचे भाग्य मिळते.
यावर्षी रविवार ६ ऑक्टोबर २०२४ सकाळी ७.१५ वाजता हा योग आहे. या अलौकिक सोहळ्याचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा. असे आवाहन श्रीदेवी सातेरी देवस्थान विश्वस्त मंडळाकडून करण्यात आले आहे.











