बिग बॉस मराठी सीझन ५ चा सुरज चव्हाण विजेता, अखेर ‘गोलीगत पॅटर्न’ ठरला यशस्वी

मुंबई :

बिग बॉस मराठी सीझन ५ च्या झगमगत्या ट्रॉफीवर अखेर सूरज चव्हाणने आपलं नाव कोरलं आहे. सुरुवातीपासूनच अगदी शांतपणे खेळ करणाऱ्या सुरजचा खेळ व निरागसपणा साऱ्यांच्याच पसंतीस पडला होता. त्यामुळे प्रेक्षकांची पसंती व मौल्यवान वोटस् मिळवित बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या ट्रॉफीवर अखेर सूरजने नावं कोरलं आहे.
सुरुवातीपासूनच सूरज चव्हाण विजेता होणार याची चर्चा सोशल मीडियावर होती. त्याचप्रमाणे घरातल्या इतर स्पर्धकांना त्याने ज्या प्रकारे टास्कमध्ये टक्कर दिली याचंही अनेकदा कौतुक झालं होतं. इतकच नव्हे तर बिग बॉसच्या घरातील कॅप्टन होण्याचीही संधी सूरजने मिळवली होती. त्यामुळे इतर स्पर्धकांपेक्षाही तो वरचढ ठरलाय.
टॉप 6 मधून सूरज चव्हाणची बाजी

निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण हे बिग बॉस मराठीचे फायनलिस्ट होते. यामध्ये आधी जान्हवी किल्लेकर ही नऊ लाख रुपये घेऊन त्यानंतर अंकिता वालावलकर घराबाहेर पडल्या. टॉप चार स्पर्धकांमधून धनंजयला माघार घ्यावी लागली. त्यामुळे सूरज, अभिजीत आणि निक्कीने टॉप 3 मध्ये धडक दिली. यामध्ये सूरजने बाजी मारत टॉप 2 मध्ये स्थान मिळवलं. अखेर प्रेक्षकांनी निर्णय देत सूरजला बिग बॉस मराठीचा विजेता केलं.

सूरज चव्हाण कोण आहे?

मूळचा बारामतीचा असलेला सूरज हा टीकटॉकमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. पण असं असलं तरीही सूरजचं वैयक्तिक आयुष्य हे फार खडतर गेलंय. सूरज लहान असतानाच त्याच्या आई-वडीलांनी जगाचा निरोप घेतला. घराची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याला केवळ आठवीपर्यंत शिक्षण घेता आलं. सूरजला पाच बहिणी असून त्याच्या मोठ्या बहिणीने सूरजचा सांभाळ केला.

बुक्कीत टेंगूळ, गुलीगत धोका अशा त्याच्या शब्दांमुळे आणि रिल्समुळे सूरज चांगलाच फेमस झाला. त्यानंतर त्याला बिग बॉस मराठीची ऑफर देण्यात आली. सुरुवातीला सूरज बिग बॉसच्या घरात यायला तयार नव्हता असं अनेकदा बिग बॉसच्या टीमकडून सांगण्यात आलं आहे. पण बिग बॉसच्या टीमने त्याला घरात येण्यासाठी तयार केलं. त्यानंतर आता सूरजने थेट बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.