परुळेबाजार गाव भूमिगत वीज वाहिन्यानी जोडला जाणार : कर्ली येथे झाला कामाचा शुभारंभ

शासनाकडून राष्ट्रीय आपत्ती निवारण प्रकल्प अंतर्गत मंजुरी…

परुळे : प्रतिनिधी

परुळेबाजार ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात राष्ट्रीय आपत्ती निवारण प्रकल्प अंतर्गत भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याच्या कामाचा शुभारंभ कर्ली येथे सोमवारी संपन्न झाला. लवकरच परुळेबाजार गाव भूमिगत विजवाहिन्यानी जोडले जाणार असून गावच्या विकासाच्या दृष्टीने ते आणखी एक मोठे काम ठरणार आहे.

आजच्या या कार्यक्रमावेळी सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दूधवडकर, ग्रा .प. सदस्य नमिता परुळेकर, ग्रामसेवक शरद शिंदे यांच्या सह दीपक दुधवडकर, मंदार नेवाळकर, प्रविण करलकर, प्रकाश करलकर, वामन मांजरेकर, अनंत पडवळ, रोहिणीकांत गोवेकर, रक्षिता गोवेकर, मंगेश तांडेल आदी उपस्थित होते.

जमिनीवरील वीज खांबावरुन गेलेल्या वीज पुरवठा करणाऱ्या वाहिन्या पावसाळ्यात वादळीवाऱ्या मुळे तुटणे, वीज पुरवठा खंडित होणे असे प्रकार घडत असतात त्यावर उपाय म्हणून भूमिगत वीज वाहिन्या टाकणे हेच उत्तम पर्याय आहे. त्यादृष्टीने ग्रामस्थांच्या मागणी चा विचार करून शासनाने भूमिगत वीज वाहिन्या टाकणे या कामाला मंजुरी दिली आणि आज या कामाला सुरुवात झाली आहे.