आ. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्य प्रयत्नातून माध्यमिक शाळांना ” सोलर हायब्रीड इन्व्हर्टर ” चे वाटप
सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात लवकरच ‘सुभाषचंद्र बोस शाळांची निर्मिती ‘ करण्यात येणार असून सावंतवाडी, वेंगुर्ला व सासोली याठिकाणी या शाळा लवकरच उभारण्यात येणार आहेत. ज्या शाळेत पटसंख्या कमी असते आणि तिथल्या मुलांना उत्कृष्ट शिक्षण घेता येत नाही अशा मुलांसाठी या शाळांची निर्मिती करण्यात येत आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली.
कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रयत्नाने सिंधुदुर्ग जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६० माध्यमिक शाळांना ” सोलर हायब्रीड इन्व्हर्टर ” चे वाटप करण्याचा कार्यक्रम येथील आर पी डी हायस्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी आमदार शंकर कांबळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, भाजपचे आंबोली मंडल अध्यक्ष रवि मडगांवकर, शहर मंडल अजय गोंदावळे, माजी शिक्षण सभापती गुरुनाथ पेडणेकर, माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे, भाजपचे वेंगुर्ले तालुका अध्यक्ष सुहास गवंडळकर, सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्पे, सचिव गुरुदास कुसगावकर,जिल्हा उपाध्यक्ष सुहास देसाई ,आर पी डी चे मुख्याध्यापक जगदीश धोंड,यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
ते म्हणाले, सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. त्यामुळे प्रत्येक शाळेमध्ये आधुनिक तंत्रज्ञान यायला हवे ही आमची नेहमीच भावना राहिली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखे आधुनिक तंत्रज्ञान जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.
याच पार्श्वभूमीवर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रेरणेतून सर्व शाळा डिजिटल करण्याबरोबरच सौरऊर्जेच्या माध्यमातून ग्रीन शाळा ही संकल्पना राबविली जात आहे. शिक्षकांनी या सुविधांचा वापर करून पुढील काळात आपलं पूर्ण लक्ष हे मुलांच्या शिक्षणावर केंद्रित करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
शिक्षक हे मुलांचे जीवन घडवत असतात त्यामुळे अशा शिक्षकांवर कोणताही अन्याय होणार नाही याची निश्चितच काळजी घेतली जाईल. त्यामुळेच शिक्षण मंत्री या नात्याने शिक्षकांसाठी जे जे करता आलं ते ते करण्याचा मी प्रयत्न केला आहे. आगामी काळात सर्व शाळांना सोलरचा निधी देण्यात येणार आहे. डोंगरी शाळेंच्या पटसंख्येचा निकष २० वरून १५ वर आणण्यात आला आहे तर अल्पसंख्यांक प्रवर्गातील शाळांच्या पटसंख्येचा निकष तीस वरून वीस वर आणण्यात आला आहे ,अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
त्याशिवाय प्राथमिक शाळेत निवृत्त शिक्षक देण्याचा निर्णय ज्या पद्धतीने घेतला त्याप्रमाणे माध्यमिक शाळांमध्ये निवृत्त शिक्षक घेण्याबाबत सरकार आगामी काळात निश्चितच विचार करेल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शिक्षकांची व्यथा शिक्षकच जाणू शकतो : आ. ज्ञानेश्वर म्हात्रे
शिक्षकांची व्यथा ही एक शिक्षकच जाणू शकतो. मी देखील एक शिक्षकच आहे त्यामुळे निवडून आल्यानंतर एकही दिवस वाया न घालवता केवळ शाळा शिक्षक व विद्यार्थी यांच्या उत्कर्षासाठी मी झटत आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर पालकमंत्री रवींद्र चव्हाण व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून कोकणातील जास्तीत जास्त शाळांना तसेच येथील शिक्षकांना न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करीत असल्याचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले ,कोरोनात दगावलेल्या शिक्षकांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर सेवेत सामावून घेण्यात आले आहे. तसेच अनुदानित शाळांना अकराशे कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. त्याच माध्यमातून आतापर्यंत १० कोटींचं ई लर्निंग साहित्य शाळांना दिलं आहे. एलईडी प्रोजेक्टर टायपॅड यासारख्या सुविधा शाळांना पुरविण्यात आल्या असून या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्याकडे आमचा कल आहे. आगामी काळात मी जिल्ह्यातील सर्व शाळांना प्रत्यक्ष भेट देणार असून शाळांना देण्यात आलेलं साहित्य पडून राहू नये त्याचा मुलांसाठी योग्य वापर केला जावा याची मी प्रत्यक्ष पाहणी करणार आहे.
शिक्षकांचे सर्व असे प्रश्न सोडविण्यासाठी माझे प्रयत्न असून आगामी काळात अशैक्षणिक कामातून मुक्तता मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत केवळ निवडणूक व जनगणना या व्यतिरिक्त कोणतीही कामे शिक्षकांना देण्यात येणार नाहीत. तसेच वेतनेतर अनुदान मिळवून देण्यासाठी देखील मी प्रयत्न करणार आहे. शिक्षण विभागात झालेला एजंटांचा सुळसुळाट थांबविण्यासाठी यापुढे कठोर पावले उचलली जातील असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.












