‘जल्लोष लोककलेचा’ जिल्हास्तरीय समुह नृत्य स्पर्धेत जि. प. शाळा विश्वनाथ विद्यालय राजापूर नं.१ चे सुयश

 

राजापूर (वार्ताहर): बालरंगभूमी परिषद, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘जल्लोष लोककलेचा’ या जिल्हास्तरीय लोककला महोत्सवात समुह नृत्य स्पर्धेत येथील जि. प. शाळा विश्वनाथ विद्यालय राजापूर नं.१ ने उत्तम पारितोषीक पटकावले आहे.

 

 

चिपळूण येथे दि. ४ व ५ ऑक्टोबर रोजी ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत १७५ संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये विश्वनाथ विद्यालय राजापूरने सादर केलेल्या फुगडी नृत्याने उत्तम सादरीकरणाचे पारितोषिक प्राप्त झाले. याबद्दल मान्यवरांचे हस्ते रोख रूपये ५ हजार, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
विश्वनाथ विद्यालयाच्या या फुगडी नृत्य संघात कु. गौरी, ओवी, ईश्वरी, स्वरा, सार्था, अदिती, समृध्दी, पूजा आणि निरजा यांनी सहभाग घेतला. तर ढोलकीवादन प्रदिप चव्हाण, वेशभूषा दिपक चव्हाण, नेपथ्य प्रियंका कोंडे, तर सौ. अंकिता बाणे, सौ.श्वेता भिडे यांनी गायनाची धुरा सांभाळली.

 

 

या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले, शिक्षण विस्तार अधिकारी विजय बंडगर, केंद्रप्रमुख अनिल जायदे, मुख्याध्यापिका श्रीमती अक्षता रहाटे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप चव्हाण, व कमिटी सदस्य, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष सचिन पवार, माता पालक संघ उपाध्यक्षा श्रेया भोसले व सदस्य यांनी अभिनंदन केले.