रत्नागिरी : राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील गणित विषयाचे शिक्षक मयुरेश रविंद्र कांदळकर यांना रत्नागिरी जिल्ह्यात इ. ११ वी आणि इ. १२ वी या गटामध्ये गणित विषयासाठी तयार केलेल्या शैक्षणिक व्हिडिओसाठी जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. सदर स्पर्धा २०२३-२४ ह्या शैक्षणिक वर्षामध्ये ठराविक मुदतीत घेण्यात आली होती.
आजच्या आधुनिक काळामध्ये ऑनलाइन शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे दर्जेदार ई- साहित्याची निर्मिती व्हावी या अनुषंगाने सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होईल आणि त्यातून विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक साहित्य सहजपणे उपलब्ध करून देता येईल असा या स्पर्धेचा उद्देश होता. यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक तसेच मुख्याध्यापक यांच्यासाठी गटवार विभागणी करून भाषा, ज्ञान,सामाजिक शास्त्र तसेच गणित या विषयांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
श्री. कांदळकर यांनी प्राप्त केलल्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी तसेच पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर यांनी अभिनंदन केले आहे.










