वादळ, वारा आणि ढगफुटी…! 

जागतिक पर्यावरणातील बदलाची चर्चा जशी ती अमेरीकेतील हवामान शास्त्रज्ञांच्या चर्चासत्रात होते. तशी ती कोकणातील एखाद्या टपरीवजा हॉटेलमध्येही चहा-भजीचा आस्वाद घेताना गावातला शेतकरी चर्चा करतो. या चर्चा करण्याला एक अनुभवाची किनार असते.

त्याआधारे महाराष्ट्रातील कोकणातील आणि जागतिक हवामानावरही चर्चा होते. गेल्याकाही वर्षांमध्ये हवामान खात्याचे अंदाज काहीसे अचूक म्हणता येणारे नसले तरीही ते अंदाज जवळपास पोहचणारे असतात. परंतु पूर्वी आकाशाकडे पहात आपला शेतकरी अचूक सांगायचा आता पाऊस कुठे पडत असेल किंवा किती वेळात पाऊस पडेल हा अंदाज बरोबर यायचा. घराबाहेर पडताना एवढ्यात पाऊस पडणार नाही या कुटुंबातील जाणत्या व्यक्तीच्या विश्वासक शब्दांवर कोणीही निधीस्तपणे छत्री न घेता सहज घराबाहेर पडायचा.

 

परंतु अलिकडच्याकाळात मात्र वातावरणाविषयी कोणताच अंदाज बांधणे कठीण आहे. यावर्षी वादळ वाऱ्याने बागायती, विजेचे खांब फार मोठ्याप्रमाणात कोकणात नुकसान केले आहे. भातशेतीचेही नुकसान पडणाऱ्या पावसाचे होत आहे. भातपिक तयार झाले आहे. भातशेती कापणीचा हा हंगाम आहे. कोसळणारा पाऊस आणि होणार वादळ होत्याच नव्हत करून टाकते. कोकणातील अनेक भागात गेल्या दोन महिन्यात मोठ्याप्रमाणात पाऊस कोसळत आहे. कोसळणारा हा पाऊस ढगफुटीचा पाऊस येतोय. यामुळे सहाजिकच जनजीवन कशाप्रकारे विस्कळीत होत याचा अनुभव महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून घेतला जात आहे.

 

पूर्वी असा काही पाऊस कोसळला की ढगफुटी सदृश्य असा शब्द वापरला जायचा. आतातर ढगफुटी सदृश्य नव्हेतर ढगफुटीने निर्माण होणारी भयानक स्थिती आपण अनुभवतो. जो पाऊस दोन-पाच दिवसांमध्ये व्हायचा तोच पाऊस आता तास-दिड तास कोसळतो. होत्याच नव्हत करणारी ही ढगफुटी असते. खरंतर कोकणाला पावसाच काहीच नवल वाटत नाही. एकदा जून महिन्यात पाऊस सुरू झाला की तो सर्वसाधारणपणे नोव्हेंबर अखेरीस थांबायचा. अलिकडे वर्षभर पाऊस पडतो. बर कोणत्या महिन्यात पाऊस पडेल हे कोणालाच सांगता येत नाही. ज्या-ज्या भागामध्ये ढगफुटी झाली त्या भागातील शेती-बागायतीची फारमोठी हानी झाली आहे. या ढगफुटीच्या पूर्वी मोठ्ठ वादळ होत. या वादळात मोठ-मोठी झाड जमीनीवर येतात. यातून कोकण भागात विजेचा प्रश्न गावो-गावी निर्माण होत आहे. अनेक गावांचा विजपुरवठा खंडित झालेला आहे. त्याची देखभाल दुरूस्ती करायची ठरवली तरी तातडीने शक्य होत नाही. ग्रामीण भागात तर आठ-पंधरा दिवस देखील विजपुरवठा खंडित होतो. गावो-गावी विजच नसते. शहरातील नागरीक पंधरा मिनिटे विज नसेल तर विज वितरणच कार्यालय गाठतात. विज विजरणच्या कार्यालयात जाऊन आकांड-तांडव करतात. ग्रामीण भागातील जनता यापेक्षा अंधारात रहाणे पसंद करते. कारण विज वितरणचा कर्मचारी लाईनमन जेव्हा लक्ष घालेल तेव्हा विज येणार नाही तर ग्रामीण भागातील जनतेला अंधारातच रहावे लागते. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे वारा, वादळ, पाऊस, ढगफुटी या सर्वांचा सर्वाधिक त्रास हा गावच्या ग्रामस्थांनाच अधिक होतो. ऋतुचक्रामध्ये झालेला हा बदल कोकणातील शेतकरी अनुभवत आहे. सध्या ऑक्टोबर हिट सुरू झाली आहे. या उष्णतेचा परिणामही जाणवत आहे. कोकणातला शेतकरी जरी त्याच नुकसान झालं तरीही तो सरकारदरबारी कधी ओरड करत बसत नाही. आणि नुकसान भरपाईसाठी आग्रही रहात नाही हे कदाचित कोकणच्या शेतकऱ्याच चुकीचही होत असेल उर्वरित महाराष्ट्रातील शेतकरी प्रत्येक नुकसानीच चित्र असं काही महाराष्ट्रासमोर उभं होत की सगळच संपल. परंतु तशीच स्थिती जरी कोकणातील शेतकऱ्यांच्याबाबतीत निर्माण झालेली असली तरीही तो माध्यमांसमोरही येण्याच्या मानसिकतेत नसतो. तो पुन्हा नव्या उमेदीने नव्या ऊर्जेने उभा रहातो. काम करत रहातो. परंतु हवामानातील बदलाच्या परिणामाने काजू, आंबा या फळ बागायतीत जसा परिणाम होतो तसा तो कृषी विभागातील सर्वच पिकांच्या बाबतीत होत असतो. परतीच्या पावसाने शेतकरी हैराण आहे. विजांचा लखलखटात अनेक उपकरण जळत आहेत. म्हणजे घरातील उपकरण जशी जळतात तशी शेती पंप देखिल जळण्याचे प्रमाण यामुळे अधिकच आहे. मागील आठवडाभराचाच विचार केला तर कोकणात पावसाच आक्राळ-विक्राळ रूप कोकणवासिय अनुभवतोय. ढगफुटीचा पाऊस, प्रचंड वादळ, विजेचा लखलखाट मध्येच उष्मा असं समिश्र वातावरणाचा अनुभव कोकणात येत आहे. एकिकडे महाराष्ट्रात आगामी होऊ घातलेल्या निवडणुकांच वातावरण ढवळून निघत आहे. राजकीय वातावरणातील बदल महाराष्ट्रातील जनता रोजच पहात आणि अनुभवत असताना हवामानातील बदलाचा परिणाम आणि होणार नुकसान कस टाळायच असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. अनेक भागात भातशेती पाण्याखाली गेली आहे. शेतात तयार झालेलं भात घरात कस पोहोच करता येईल अशा चिंतेत कोकणातील शेतकरी आहे. एकीकडे सकाळी उन्ह पडल्यासारख वाटत पण दुपारी पावसाचा धुमाकुळ सुरू होता यामुळे भातकापणीचा हंगाम असतानाही भातकापणी अनेकांची राहून गेली आहे. एकूणच या ढगफुटीने सारच बिघडवल आहे.