भाजपा नेते निलेश राणे यांनी राज्य शासनाचे मानले आभार
मालवण | प्रतिनिधी : भाजपा महायुती सरकार जनहिताचे निर्णय घेत आहे. मच्छिमारांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी महाराष्ट्र सागरी मच्छिमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय मच्छिमार समाजासाठी लाभदायक व दिशादर्शक ठरणारा आहे.
मच्छिमार समाजाच्या प्रश्ना बाबत न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नाशील असणारे भाजपा नेते निलेश राणे यांनी राज्य शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करताना आभार व्यक्त केले आहेत.
राज्यात ७२० की.मी. किनारपट्टीवर वसलेल्या मच्छिमारांसाठी हा क्रांतीकारक निर्णय आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या १२१ की.मी वसलेल्या सुमारे २५ हजार कुटूंबानाही यांचा अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न राहणार आहेत.
महाराष्ट्र सागरी मच्छिमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करताना सागरी क्षेत्रातील मच्छिमारांचे जीवनमान उंचावणे, परंपरागत मच्छिमारी करणाऱ्या मच्छिमारांचे हित जतन करणे, सागरी क्षेत्रात काम करणाऱ्या मच्छिमारांना रोजगारांच्या संधी निर्माण करणे, मासेमारी उत्पन्न, विक्री त्यावरील प्रकिया उद्योग याबाबतीत शासनास उपाय सुचविणे, मासे सुकविणे, मासे वाळविणे, विक्री तसेच मासे जास्त काळ टिकून राहण्यासाठी उपाय सुचविणे, मच्छिमार समाजाच्या आर्थिक व सामाजिक स्तर वाढविण्यासाठी कार्य करणे. हा प्रमुख उद्धेश या सागरी मच्छिमार कल्याणकारी महामंडळाचा असून महाराष्ट्र राज्य मच्छिमार कल्याणकारी महामंडळ स्वायत्त व स्वयंपुर्ण असावे यासाठी राज्यसरकार कडून ५० कोटी रुपये अनुदान देण्यात आले आहे.
सदर मंडळाचे अध्यक्ष मत्स्यव्यवसाय मंत्री, उपाध्यक्ष राज्यमंत्री, मत्स्यव्यवसाय, सचिव मत्स्यव्यवसाय, उपसचिव मत्स्यव्यवसाय, सागरी सहआयुक्त मत्स्यव्यवसाय, जिल्हास्तरीय संस्था ५ प्रतिनिधी अशी रचना असणार आहे.












