साटवली पंचक्रोशीत माकडांचा उपद्रव वाढला 

 

 

ग्रामस्थांच्या घरादारासह बागायती, भाजीपाला यांची नासधूस, शेतकरी हैराण 

लांजा (प्रतिनिधी) तालुकाच्या पश्चिम भागात वसलेल्या साटवली गावामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात माकडांचा उपद्रव वाढला आहे. वीस ते पंचवीस जणांच्या झुंडीने फिरणाऱ्या या माकडांच्या टोळ्यांनी येथील ग्रामस्थांच्या घरांच्या नुकसानी बरोबरच बागायती, भाजीपाला यांची नासधूस केली जात आहे. त्यामुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे.

पश्चिम भागात गेल्या काही महिन्यांपासून माकडांच्या टोळ्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पश्चिम भागातील साटवली भाग आंबा उत्पादक शेती साठी प्रसिद्ध आहे .तसेच मोठमोठ्या आंबा काजूच्या बागा आहेत. टोळ्यांनी फिरणार्या माकडांनी मानव वस्तीमध्ये मोर्चा वळवला असून घरांवर उड्या मारून नळे, पत्रे फोडले जात असल्याने लोकांना नुकसानीला सामोरे जावे लागते आहे . तसेच आता येणारी आंबा झाडाला पालवी खाऊन टाकण्याचे काम देखील हे माकड अगदी पद्धतशीरपणे करत असतात यामुळे येथील शेतकऱ्यांना याचा त्रास मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागत आहे.

सकाळी उजाडल्यापासून ते संध्याकाळी दिवस मावळेपर्यंत या माकडांचा उपद्रव मोठ्या प्रमाणामध्ये आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेती, भाजीपाला लागवड करणे हे देखील मुश्किल झालेले आहे. फळबागायतीची देखील माकडांकडून नासधूस केली जात आहे. त्यामुळे वनविभागाने याकडे लक्ष देऊन माकडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी साटवली आंबा बागायत शेतकरी, प्रसाद तरळ व ग्रामस्थांकडून होत आहे