सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यामध्ये दिनांक 15 ऑक्टोंबर 2024 पासून निवडणूक आदर्श आचारसंहिता अंमलात येऊन विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची प्रक्रीया सुरु झालेली आहे. निवडणूकीचे पावित्र्य राखण्यासाठी तसेच खुल्या, पारदर्शक आणि शांततापूर्ण वातावरणात निपक्षपणे निवडणूका पार पाडण्यासाठी निवडणूक प्रक्रीयेच्या दरम्यान विविध राजकीय पक्ष, उमेदवार, त्याचे प्रतिनिधी यांच्याकडून केल्या जाणाऱ्या निवडणूक विषयक खर्चाचे सक्त संनियंत्रण करण्यासाठी जिल्ह्यामध्ये भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार समुचित निवडणूक खर्च संनियंत्रण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेल्या असल्याची माहिती जिल्हा खर्च सनियंत्रण समिती समन्वय अधिकारी अमित मेश्राम यांनी दिली आहे.
विधानसभा निवडणूक खर्च संनियंत्रण प्रक्रीयेचा एक भाग म्हणून निवडणूकीच्या प्रक्रियेदरम्यान, मतदान संघामध्ये प्रचारावर बेसुमार खर्च, रोख रक्कमेत किंवा इतर प्रकारे लाच म्हणून वस्तूंचे वाटप करणे, बेकायदेशीर हत्यारे, दारुगोळा, मद्य यांची वाहतूक किंवा समाजकंटक यांवर लक्ष ठेवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी स्थिर संनिरीक्षण पथके आणि भरारी पथके तैनात करण्यात आलेली असून दिनांक 16 ऑक्टोबर 2024 पासून त्यांचे काम अहोरात्र सुरु झालेले आहे.
भारत निवडणूक आयोगाकडील आदेशानुसार भरारी पथके आणि स्थिर संनिरीक्षण पथके यांचेद्वारे अनुसरावयाची प्रमाणभुत कार्यपालन पध्दती विहित करण्यात आलेली आहे. त्यानुसार या पथकांकडून कामकाज करण्यात येत आहे. भरारी पथकाकडून आणि स्थिर संनिरीक्षण पथकाने केलेल्या जप्तीच्या कार्यवाहीच्या संपूर्ण प्रक्रीयेचे छायाचित्रण करण्यात येणार आहे.
नागरीकांना भरारी पथके आणि स्थिर सनिरीक्षण पथके यांच्या वर्तणुकीबाबत काही तक्रारी करावयाच्या असल्यास त्यांनी उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, यांच्याशी 02362- 228854 किंवा समन्वय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) नितीन राऊत यांच्या मोबा. 9423032530 या क्रमांकावर संपर्क करावा.
भरारी पथके आणि स्थिर संनिरिक्षण पथके यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या संशयास्पद वस्तू किंवा रोख रक्कमा यांचा जर राजकीय पक्ष, उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधी यांच्याशी संबंध संभवत असेल तर त्याप्रकरणी भरारी पथकाद्वारे किंवा स्थिर संनिरिक्षण पथकाव्दारे समुचित न्यायालयामध्ये फिर्याद दाखल करण्यात येवून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अशा प्रकरणी जप्त केलेल्या वस्तू व रक्कमा न्यायालयाच्या निर्णयानुसार न्यायालयाकडून यथास्थिती आणि यथावकाश मुक्त करण्यात येतील.
तथापि, ज्या प्रकरणी भरारी पथक आणि स्थिर संनिरीक्षण पाठ यांचेव्दारे जप्त केलेल्या वस्तू, आणि रक्कमा यांचा कोणत्याही राजकीय पक्ष, उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांच्याशी थेट संबंध येत नसल्याचे सकृतदर्शनी आढळून येईल, अशा प्रकरणी जप्तीच्या कार्यवाहीच्या संदर्भातील नागरीकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी, गुणवत्तेच्या आधारे शहानिशा करून, जप्त केलेल्या वस्तू आणि रक्कमा मुक्त करण्याचा आणि प्रकरणपरत्वे पुढील नियमोचित कार्यवाही करणेचा निर्णय घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.
या समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, जिल्हा कोषागार अधिकारी, अमित मेश्राम, स्थानिक निधी लेखा परीक्षा सहाय्यक संचालक, डॉ. शिवप्रसाद खोत हे या समितीचे सदस्य असून आवश्यकता भासल्यास त्यांच्याशी 8655030300 या संपर्क क्रमांकावर संपर्क करण्यात यावा.
जिल्ह्यातील 268-कणकवली, 269-कुडाळ, 270-सावंतवाडी तीन विधानसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगांकडून नियुक्त करण्यात आलेले निवडणूक खर्च निरीक्षक श्रीम. दिव्या के.जे दि.22 ऑक्टोंबर 2024 रोजी दाखल झालेले आहेत, ते शासकीय विश्रामगृह, ओरोस येथे वास्तव्यास आहेत, त्यांचा मोबाईल नंबर 9359688515 असा आहे.











