नारायण राणेंचा विजय झांकी है निलेश राणे का विजय बाकी है
‘कद्रु ‘ वृत्तीच्या माणसांमुळेच नारायण राणेंसारखे ‘मास लिडर ‘ सेनेपासून दूर
एकनाथ निलेश राणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा
कुडाळ : कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. कोकणात त्या काळात शिवसेना वाढविण्यात नारायण राणे यांचा फार मोठा वाटा आहे. त्यांच्यासारखे हजारो शिवसैनिकांच्या रक्तातून ही शिवसेना उभी राहिली. मात्र, बाळासाहेबांचे व शिवसेनेचे विचार ज्यांनी खुर्चीसाठी सोडले बाळासाहेबांच्या विचारांची ज्यांनी बेईमानी केली, बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव करणाऱ्यांना ज्यांनी साथ दिली, कोकणच्या विकासात खोडा घातला त्यांना चारीमुंड्या चित करण्यासाठी व कुडाळ मालवण मतदारसंघाचा थांबलेला विकास पुन्हा मार्गी लावण्यासाठी निलेश राणे यांनी धनुष्यबाण उचलण्याचा निर्णय घेतला आहे. राणेसाहेबांनी जिथून सुरुवात केली तिथेच निलेश राणे आले असून एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. धनुष्यबाण कोकणच्या सुपुत्राच्या हातीच शोभून दिसतं आणि निलेश राणे आपल्या कर्तुत्वाने ते सिद्ध करतील हा मला विश्वास आहे. ज्याप्रमाणे नारायण राणे व नितेश राणे वर प्रेम केलेत तसेच प्रेम व विश्वास निलेश राणे यांच्यावर दाखवा, हा एकनाथ निलेश राणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासारख्या शिवसैनिकांमुळे शिवसेना उभी राहिली. त्यांच्यासारख्या शिवसैनिकांनी अनेक प्रसंगात सामोरे जाऊन शिवसेना वाचवली. स्वतःच्या कर्तुत्वाने त्यांनी केलेला शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री हा प्रवास आम्ही जवळून पाहिला आहे. मात्र, ज्यांचा स्वतःच्या कर्तुत्वावर विश्वास नसतो त्यांना स्वकर्तुत्वावर मोठे झालेले राणेसाहेबांसारखे ‘ मास लिडर ‘ चालत नाहीत. त्यामुळेच त्यांना दूर घालवले जाते. खर तर शिवसेनेत फाटा फूट झाली नसती तर शिवसेनेला आव्हान द्यायला कोणीही उभा राहिला नसता. पण ज्यांना स्वतःला मोठे व्हायचे आहे अशा ‘ कद्रु ‘ वृत्तीच्या माणसांमुळेच राणेसाहेबांसारखे आमच्यासारखे माणूस दूर गेले, अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली.
बाळासाहेब होते तेव्हा दिल्लीचे व देशातील अनेक नेते मातोश्रीवर येत होते. आज ‘ मला करा मला करा ‘ असे सांगत दिल्लीच्या गल्ली गल्लीत काहीजण फिरत आहेत. मात्र, मित्र पक्षांनाच ज्यांचा चेहरा नको आहे त्यांना दिल्ली काय जवळ करणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आज घराघरात पोहोचली आहे. लाडक्या भावांसाठी ही आम्ही योजना राबविली आहे. शेतकरी कामगार गोरगरीब यांच्या हिताच्या अनेक योजना राबविलेल्या आहेत. मुलींना मोफत शिक्षण दिल जात आहे. पिक विमा योजना तसेच विज बिल माफी यासारखे अनेक क्रांतिकारी निर्णय केवळ अडीच वर्षात आम्ही घेतले आहेत .कोकण विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून बॅकलॉग भरून काढला आहे. दीपक केसरकर यांच्या शिक्षण क्षेत्रातही अनेक अमुलाग्र बदल केले असून अनेक निर्णय घेतले आहेत. आम्ही केवळ अडीच वर्षात केलेला विकास पाहता आम्हाला विश्वास आहे की राज्यातील जनता त्याची पोचपावती आम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार निवडून येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शिवसेना व भाजप वेगळी नाही. आज निलेश राणे यांनी शिवसेनेत प्रवेश करून महायुतीला एक नवी ताकद दिली आहे. लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांना या मतदारसंघात २५ हजारांच मताधिक्य होतं. आपली निष्ठा व आपलं प्रेम पाहता मला आता दुप्पट विश्वास निर्माण झाला आहे की आगामी विधानसभा निवडणुकीत कुडाळ मालवण मतदार संघात निलेश राणे यांना ५२ आजारांचं मताधिक्य नक्की मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.










