राजापूरात महाविकास आघाडीत फूट, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांची बंडखोरी

राजापूर (प्रतिनिधी):राज्यात महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा घोळ सुरू असतानाच व राजापूरात महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवार म्हणून उबाठा गटाचे आमदार राजन साळवी यांना तिकीट जाहीर झालेले असताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. लाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांसह बहुतांश पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावल्याने राजापूरात महाविकास आघाडीत फूट पडली आहे.
राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदार संघ काँग्रेसला सोडावा अशी आग्रही मागणी काँग्रेसकडून करण्यात आली होती. काँग्रेसकडून इच्छुक म्हणून काँग्रेसच्या माजी आमदार अड. हुस्नबानू खलिफे, जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी पक्षाकडे मुलाखती दिल्या होत्या. मात्र महाविकास आघाडीकडून हा मतदार संघ शिवसेना उबाठा गटाला सोडण्यात आला. इथुन उबाठा गटाचे विद्यमान आमदार राजन साळवी यांना तिकीट जाहीर झाले. व त्यांनी गुरूवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

 

 

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी मंगळवारी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेत आपण राजापूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली होती. गुरूवारी लाड यांनी शहरातील श्री मंगल कार्यालयात मेळावा घेत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. त्यानंतर त्यांनी निवडणूक कार्यालयात जावून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष किशोर नारकर यांसह शहर व ग्रामिण भागातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थीत होते. तर दुसरीकडे काँग्रेसच्या माजी आमदार सौ. खलिफे यांनी राजन साळवी यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करतानाच उमेदवारी अर्ज दाखल करताना देखील हजेरी लावली. त्यामुळे राजापूरात काँग्रेस कार्यकर्त्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. राजापूरात काँग्रेसमध्ये पर्यायाने महाविकास आघाडीत फुट पडल्याचे दिसून आले आहे.