जोरदार शक्तीप्रदर्शन करत राजापूरात किरण सामंत, राजन साळवी व अविनाश लाड यांचे उमेदवारी अर्ज दाखल

महाविकास आघाडीत फुट

चार उमेदवारांकडून सात अर्ज दाखल

राजापूर (वार्ताहर): गुरूपुष्यामृताच्या शुभ मुहुर्तावर गुरूवारी राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदार संघासाठी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत शिवसेना भाजपा महायुतीतर्फे किरण उर्फ भैय्या सामंत, महाविकास आघाडीतर्फे विद्यमान आमदार राजन साळवी यांनी तर अपक्ष म्हणून काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीत फुट पडली आहे.

 

 

 

राजापूरात गुरूवारी चार उमेदवारांनी सात नामनिर्देशनपत्र दाखल केली.त्यामध्ये किरण सामंत यांनी तीन, राजन साळवी यांनी दोन तर अविनाश लाड यांनी एक तर अपक्ष म्हणून यशवंत हर्याण यांनी एक असे सात उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून देण्यात आली.
राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदार संघात निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. गुरूवारी प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार अर्ज दाखल करणार असल्याने पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. निवडणूक प्रशासकिय यंत्रणेने रॅलीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यास निर्बंध घातल्याने मोजक्या लोकांच्या उपस्थीतीत तिन्ही उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णय अधिकारी तथा राजापूर प्रांताधिकारी डॉ. जॅमस्मिन यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले. तिन्ही उमेदवारांचे समर्थक मोठया संख्येने राजापूरात दाखल झाल्याने राजापूर शिवाजीपथ तसेच मुख्य मार्गावर काही काळ वाहतुक कोंडीचा सामना करावा लागला.

 

 

 

 

अर्ज दाखल करण्यापुर्वी तीन्ही उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत कार्यकर्ता मेळावा घेतले.
महायुतीतर्फे किरण सामंत यांनी जवाहरचौक येथील छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी पाटीलमळा येथील यशोदिन सृष्टी सभागृहात भव्य मेळावा घेतला. या मेळाव्यात गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पालकमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत यांसह शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार गट तसेच महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थीत होते.
रत्नसिंधु समितीचे सदस्य आणि उद्योजक असलेले किरण सामंत प्रथमच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कनिष्ठ बंधू राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांसह महायुतीचे मोठे पाठबळ त्यांच्यामागे आहे. आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने भव्य मेळावा घेत त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत रणशिंग फुंकले आहे. त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री ना. प्रमोद सावंत, उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शिवसेनाजिल्हाप्रमुख राहुल पंडीत यांच्या उपस्थीतीत आपला उमेदवारी अर्ज डॉ. जॅस्मीन यांच्याकडे दाखल केला.
तर विद्यमान आमदार राजन साळवी यांनी शिवसेना उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या माध्यमातून अधिकृत उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पुर्वी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन सभागृहात मेळावा घेत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. या ठिकाणी नितीन बांडगुळे यांच्या प्रमुख उपस्थीतीत मार्गदर्शन मेळावा पार पडला. त्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज डॉ. जस्मिन यांच्याकडे सुपुर्द केला. याप्रसंगी त्यांचे समवेत काँग्रेसच्या माजी आमदार अड. हुस्नबानू खलिफे, अजित यशवंतराव, जिल्हाप्रमुख विलास चाळके, सौ. अनुजा साळवी, संजय साळवी आदी उपस्थीत होते.

 

 

 

आमदार राजन साळवी हे मागील तीन टर्म या मतदार संघाचे आमदार राहिले आहेत. त्यांना पुन्हा एकदा पक्षाने तिकीट दिल्याने ते चौथ्यांदा ही निवडणुक लढवत आहेत.
तर गत विधानसभान निवडणुकीत काँग्रेस पक्षामार्फत आमदार राजन साळवी यांच्या विरोधात निवडणुक लढवून पराभुत झालेले काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड बंडाचे निशाण फडकावत गुरूवारी स्वतंत्रपणे आपला अपक्ष अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत काँग्रेस तालुकाध्यक्ष किशोर नारकर, संतोष गोताड, राजेंद्र धुमक, श्रीकृष्ण हेगीष्टे, सौ. प्रणाली लाड, अमोल लाड आदींसह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थीत होते. तत्पुर्वी त्यांनीही शहरातील श्री मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळावा घेत जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
अर्ज दाखल करण्याचा मुहुर्त साधण्यासाठी उमेदवारांची पळापळ
किरण सामंत दुचाकीने तर राजन साळवी रिक्षाने निवडणुक कार्यालयातराजापूरात गुरूवारी एकाच दिवशी महायुतीचे किरण, महाविकास आघाडीचे राजन साळवी व काँग्रेसचे अविनाश लाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या तिन्ही उमेदवारांकडून मोठया प्रमाणावर शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यामुळे शहरात अनेक भागात वाहतुकीची कोंडी झाली. त्याचा फटका या उमेदवारांना बसला. अर्ज भरण्याचा शुभ मुहुर्त साधण्यासाठी या उमेदवारांची चांगलीच दमछाक झाली. महायुतीचे किरण सामंत यांनी दुचाकीवरून जात मुहुर्त साधला. तर राजन साळवी यांना निवडणूक कार्यालय गाठण्यासाठी रिक्षाचा आधार घ्यावा लागला.