मैत्रिणीचे मंगळसूत्र गहाण ठेवून लाखाचे कर्ज; वर्षानंतरही परत न केल्याने पोलिसांत तक्रार
कणकवली: नातेवाईकाच्या लग्नासाठी दोन दिवसांसाठी उधार घेतलेले मैत्रिणीचे मंगळसूत्र (mangalsutra) परस्पर गहाण ठेवून फायनान्स कंपनीकडून (finance company) 1 लाख रुपयांचे कर्ज (loan) घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. एक वर्ष झाल्यानंतरही मंगळसूत्र परत न केल्याने मैत्रिणीने पोलिसांत तक्रार (complaint) दाखल केली आहे. कलमठ (Kalmath) गावात झालेल्या या घटनेमुळे स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय निर्माण झाला आहे.
तक्रारदार मयुरी नितीन मेस्त्री (34, रा. आशिये नाडकर्णीनगर) यांनी निरधा उर्फ शामल निलेश कदम (रा. कलमठ- बौद्धवाडी) हिच्याविरुद्ध फसवणूक आणि विश्वासघाताच्या आरोपाखाली कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
घटनेचा तपशील:
4 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 4 वाजता, निरधा कदम हिने मयुरी मेस्त्री यांना फोन करून आशिये-पुर्णानगर येथे येण्यास सांगितले. त्यावेळी तिने मयुरीला सांगितले की, एका नातेवाईकाच्या लग्नासाठी दोन दिवसांसाठी मुंबईला जात आहे, त्यामुळे तिला तिचे मंगळसूत्र (मूल्य: तीन तोळे) उधार देण्याची विनंती केली. दोन वर्षांपासूनच्या मैत्रीतून मयुरीने तिच्यावर विश्वास ठेवून मंगळसूत्र दिले.
चार दिवसांनी मयुरी मेस्त्री आणि तिची जाऊ धनश्री मेस्त्री यांनी निरधाच्या घरी जाऊन मंगळसूत्राची चौकशी केली. त्यावेळी निरधाने पैशांची गरज भासल्यामुळे मंगळसूत्र गहाण ठेवून 1 लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचे सांगितले. तिने काही दिवसांत मंगळसूत्र परत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, वर्ष होत आले तरी अद्याप मंगळसूत्र परत मिळाले नाही.
तक्रारीत, मयुरी यांनी निरधावर विश्वासघात (betrayal of trust) करून फसवणूक (fraud) केल्याचे म्हटले आहे.







