सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत -भोसले यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आज माजी आमदार शिवराम दळवी यांनी त्यांची भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी त्यांनी भोसले यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विजय संपादन केल्यानंतर सौ. श्रद्धा भोसले यांनी नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. या पार्श्वभूमीवर माजी आमदार दळवी यांनी ही सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी शहराच्या प्रलंबित विकासकामांबाबत आणि आगामी नियोजनाबाबत सकारात्मक चर्चा केली.
या प्रसंगी युवराज लखमराजे भोसले, बाळू परब, रेमी आलमेडा यांसह अन्य मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. माजी आमदारांच्या शुभेच्छांचा स्वीकार करताना नगराध्यक्षांनी सर्वांचे आभार मानले. सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.












