Stampede at Bandra Station : दिवाळीला गावी जायला गर्दी, ट्रेन येताच चेंगराचेंगरी, प्लॅटफॉर्मवर रक्ताचा सडा, अनेकांचे पाय फ्रॅक्चर

आता रेल्वे स्थानक, बस स्थानक आणि खासगी गाड्यांनाही मोठी गर्दी होत असल्याचं दिसून येतंय. रेल्वेकडून दिवाळीसाठी विशेष गाड्यासुद्धा सोडल्या जात आहेत.

 

दरम्यान, मुंबईत वांद्रे स्थानकात चेंगराचेंगरीची घटना घडलीय. यात ९ प्रवाशी जखमी झाले आहेत. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय.

 

पहाटे वांद्रे गोरखपूर एक्सप्रेसने जाण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर मोठी गर्दी झाली होती. या गर्दीत चेंगराचेंगरी झाली. यात जखमी झालेल्यांना भाभा रुग्णालयात दाखल केले आहे. भाभा रुग्णालयाचे एमओ डॉक्टर रितेश यांनी दिलेल्या माहितीनुसार ९ जण जखमी असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.

 

काय घडलं?

वांद्रे रेल्वे स्थानक हे पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रमुख स्थानकांपैकी एक आहे. लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या या स्थानकातून सुटतात. उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्यांना प्रवाशांची मोठी गर्दी असते. वांद्रे गोरखपूर ट्रेन पकडण्यासाठी स्थानकात मोठी गर्दी झाली होती. ही ट्रेन येताच प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर मोठ्या प्रमाणात प्रवासी ट्रेनच्या दिशेने धावले. दरवाजातून आत जाण्यासाठी प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला आणि यात चेंगराचेंगरीची घटना घडली.

 

प्लॅटफॉर्मवर रक्ताचा सडा, अनेकांचे पाय फ्रॅक्चर

चेंगराचेंगरीची घटना इतकी भीषण होती की प्लॅटफॉर्मवर रक्ताचा सडा पडला होता. जखमी झालेल्यांपैकी काहींचे पाय फ्रॅक्चर झाले आहेत. जखमींना उचलून स्ट्रेचरवरून नेण्यात आलं. रेल्वे स्थानकात असलेल्या पोलिसांनी खांद्यावरून उचलून नेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. शबीर रहमान, परमेश्वर गुप्ता, रविंद्र छुमा, रामसेवक प्रजापती, संजय कांगेय, दिव्यांशू यादव, मोहम्मद शेख, इंद्रजीत साहनी, नूर शेख अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.