दिवाळीच्या पहिल्याच दिवशी साखरी आगरच्या नाटेकर कुटुंबावर शोककळा 

 

 

मच्छीमारीची रविंद्र नाटेकरांची देवगडवारी ठरली अखेरची

 

गुहागर l प्रतिनिधी :गुहागर (Guhagar) तालुक्यातील साखरी आगर (Sakhari Agar) गावात दिवाळीच्या पहिल्याच दिवशी, 28 ऑक्टोबर 2024 रोजी तांडेल (Boat Captain) रवींद्र नाटेकर यांच्या खुनाने गावावर शोककळा पसरली आहे. देवगड (Devgad) परिसरात मच्छीमारीसाठी गेलेल्या बोटीवरील खलाशाने (Crew Member) नाटेकर यांचे शीर धडावेगळे करून बोटीलाही आग लावली. या घटनेमुळे सर्व मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

गुहागर तालुक्यातील साखरी आगर येथील रहिवासी रवींद्र नाटेकर हे राजिवड्या (Rajivada) येथील एका मच्छीमारी बोटीवर तांडेल म्हणून काम करत होते. देवगड परिसरात मच्छीमारीसाठी अनुकूल संकेत आल्याने नाटेकर यांची बोट देखील या परिसरात गेली होती. दुपारी त्यांच्या बोटीवरील परप्रांतीय खलाशाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. नाटेकर यांचे शीर धडावेगळे करून त्यांचे शरीर बोटीवरच ठेवले. यानंतर खलाशाने बोटीतही आग लावली.

 

हा धक्कादायक प्रकार घडल्याचे लक्षात येताच बोटीवरील अन्य खलाशांनी आजूबाजूच्या बोटींकडे मदतीसाठी हाक दिली. परंतु, आरोपी खलाशी बोटीवरच बसून राहिला. आजूबाजूच्या बोटींनी तत्काळ मदतीला धाव घेत बोटीवरील इतर खलाशांना सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणले.

 

घटनेची माहिती मिळताच देवगडमधील पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपी खलाशाला ताब्यात घेतले असून, बोटीत लागलेली आग विझवून बोट बंदरात आणली आहे. आता या घटनेचा तपास देवगड पोलीस करीत आहेत. नेमका खून का आणि कसा घडला, याबाबतची चौकशी सुरू आहे.

 

या घटनेची वार्ता गावात पसरल्यावर साखरी आगरमधील काही मच्छीमारांनी तातडीने देवगडकडे धाव घेतली. दिवाळीच्या पहिल्या दिवशी झालेल्या या भीषण घटनेमुळे संपूर्ण गावाला धक्का बसला आहे. दोन महिन्यांपासून एकत्र काम करणाऱ्या सहकाऱ्याने असे अमानवी कृत्य का केले, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.