कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात दिवाळी अंक २०२४ प्रदर्शन संपन्न

 

रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात दिवाळी अंक २०२४चे प्रदर्शन नुकतेच संपन्न झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला.

 

 

यावेळी महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई आणि वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या डॉ. सीमा कदम उपस्थित होते. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर म्हणाले, दिवाळी अंकातील विविध प्रकारचे वाचन साहित्य आपल्याला दिवाळी सणासारखे आनंदी करते. अनेक दिवाळी अंक साहित्यिकदृष्ट्या खुप आनंददायी असतात. दरवर्षी आपण सर्व या अंकांची वाट पाहत असतो; ज्यामुळे आपला सणाचा आनंद द्विगुणित
होतो. त्यांनी याप्रसंगी सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभकामना दिल्या. सदर कार्यक्रमाला परीक्षा नियंत्रक डॉ. विवेक भिडे, संस्कृत विभाग प्रमुख आणि ग्रंथालय समितीच्या समन्वयक डॉ. कल्पना आठल्ये, प्रा. अरुण यादव, ग्रंथपाल श्री.
किरण धांडोरे, विद्यार्थी आणि ग्रंथालय कर्मचारी उपस्थित होते. विविध विषयांना वाहिलेले अनेक दिवाळी अंक या प्रदर्शनात मांडण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन सहायक ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे यांनी केले.