आमदार नितेश राणे यांनी पक्षात केले स्वागत
आमदार नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वाचा उबाठा कार्यकर्त्यांवर मोठा प्रभाव पक्षप्रवेशाचा सिलसिला सुरूच..!
कणकवली: देवगड तालुक्यातील फणसे थोटमवाडी येथील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वाने प्रभावित होऊन भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी हा पक्षप्रवेश समारंभ पार पडला. या वेळी श्रावण राणे, सुबोध तांबे, दत्ताराम राणे, संकेत गावकर, सुरेंद्र राणे आदी मान्यवरांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
आमदार नितेश राणे यांनी गेल्या दहा वर्षांत मतदारसंघात केलेली विकासकामे आणि जनतेचे प्रश्न सोडवण्याची कामगिरी यामुळे निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेल्या त्यांच्या झंझावाती दौऱ्यात त्यांचे कार्य अधोरेखित होत आहे. ज्या ज्या गावात आमदार नितेश राणे पोहोचतात, त्या ठिकाणचे उबाठा सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत असल्याची अनेक उदाहरणे मागील महिन्यात पाहायला मिळाली आहेत. अजूनही पक्षप्रवेशांचा ओघ सुरूच आहे.
उबाठा सेनेतील अनेक कार्यकर्ते स्वतःहून आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. अनेक लोक स्वतःहून ओम गणेश निवासस्थानी येऊन पक्षप्रवेश करत असल्याचे चित्र दिसत आहे.
देवगड फणसे थोटमवाडी येथील या पक्षप्रवेशाच्या वेळी देवगड येथील भाजपचे पदाधिकारी बाळ खडपे, संजय बोबडी, राजा भुजबळ, वैभव फणसे, संदीप लाळये, संतोष गावकर, उमेश गावकर आदींसह असंख्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते.












