खेड(प्रतिनिधी) कोकण मार्गावरून धावणाऱ्या मडगाव- सीएसएमटी मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये, बुधवारी सायंकाळी ५ च्या सुमारास लांजा तालुक्यातील आडवलीनजीक बिघाड झाला. बिघाडाने अन्य रेल्वेगाड्यांच्या सेवांवर परिणाम झाला. दुसऱ्या गाडीचे इंजिन जोडल्यानंतर २ तासानंतर एक्स्प्रेस मार्गस्थ झाली.
पनवेल सावंतवाडी स्पेशललाही चार तासांचा ‘लेटमार्क’ मिळाला. दीपावलीच्या पूर्वसंध्येला रेल्वे गाड्यांच्या विस्कळीत वेळापत्रकाचा प्रवाशांना फटका बसला.
दीपावली सुट्टी हंगामामुळे कोकण मार्गावरून धावणाऱ्या नियमित.गाड्यांसह दीपावली स्पेशल गर्दीने धावत आहेत. गर्दीमुळे प्रवाशांचा चढाओढीचा प्रवास सुरू असतानाच बुधवारी रेल्वे गाड्यांच्या विस्कळीत वेळापत्रकाने दीपावलीसाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला. १२०५२ क्रमांकाची मडगाव सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस आडवलीनजीक आली असता इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे लोकोपायलटच्या निदर्शनास येताच एक्स्प्रेसला थांबा देण्यात आला.
याबाबत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवल्यानंतर
एक्स्प्रेस मार्गस्थ करण्यासाठी दुसरे इंजिन जोडण्याची धावपळ सुरू झाली. दुसरे इंजिन येईपर्यंत जनशताब्दी एक्स्प्रेसचे प्रवासी २ तास आडवलीनजीकच रखडले. १०१०५ क्रमांकाची दिवा-
सावंतवाडी एक्स्प्रेस २ तास उशिराने रवाना झाली. निजामुद्दीन- एरणाकुलम मंगला एक्स्प्रेसही १ तास विलंबाने धावली. मडगाव- सीएसएमटी तेजस एक्स्प्रेसही १ तास २५ मिनिटे उशिराने धावल्याने प्रवासी खोळंबले. अन्य ३ रेल्वेगाड्याही उशिराने रवाना झाल्याने प्रवाशांना विस्कळीत वेळापत्रकाचा फटका बसला.











