सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात होणार चौरंगी लढत

 

युती व आघाडीतील बंडखोरांसह २ अपक्षही रिंगणात

मतविभाजनचा फटका की फायदा याकडे लक्ष

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आता चौरंगी लढत होणार हे निश्चित झाले आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच बंडखोर उमेदवारांनी आपले अर्ज कायम राखल्याने महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांसमोर आव्हान उभे ठाकले आहे. तर अन्य दोन अपक्ष उमेदवारही रिंगणात राहिल्याने एकूण सहा उमेदवारांमध्ये ही लढत होणार आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदासंघाच्या निवडणूकीसाठी बंडखोर उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांनी आपली उमेदवारी कायम राखणारी आता या निवडणुकीतील रंगत वाढली आहे. महायुतीकडून शिक्षणमंत्री दीपक केसरकर, महा विकास आघाडीकडून माजी आमदार राजन तेली यांच्यासह बंडखोरी केलेले विशाल परब व अर्चना घारे तर सुनील पेडणेकर आणि दत्ताराम गावकर या अपक्षांचा समावेश आहे.

 

 

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभागीय अध्यक्षा अर्चना घारे – परब यांनी उमेदवारी न मिळाल्याने बंडाचा झेंडा हाती घेतला होता. हे दोघे आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार की निवडणूक रिंगणात कायम राहणार याकडे सर्वांचा लक्ष लागला होता. मात्र, सोमवारी उमेदवारी अर्ज घेण्याच्या शेवटच्या दिवशी तीन वाजेपर्यंत या दोघांकडून आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला नसल्याने सावंतवाडी मतदारसंघांमध्ये आता चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
सावंतवाडी मतदार संघात एकूण २ लाख ३० हजार ०२ एवढे मतदार आहेत. त्यामध्ये महिला मतदार १ लाख १५,३५४ पुरुष मतदार १ लाख १४ हजार ६४८ एवढी संख्या आहे. मतासंघातील प्रत्येक तालुक्याचे मतदार लक्षात घेता दोडामार्गमध्ये ४० हजार ७५४ वेंगुर्ल्यामध्ये ६७ हजार ९८५ तर सावंतवाडीमध्ये सर्वात जास्त म्हणजे १ लाख २१ हजार २६३ एवढे मतदार आहेत. त्यामुळे आता चौरंगी लढत होत असल्याने होणाऱ्या मतविभाजनाचा फटका बसणार की फायदा होणार याची चर्चा आता रंगू लागली आहे.

 

 

दरम्यान, उमेदवार निश्चित झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी अपक्ष उमेदवारांना चिन्हाचे वाटप केले. यावेळी ते म्हणाले की सहा उमेदवारांसह नोटा मिळून एकूण सात बटणे मतदान यंत्रावर असणार आहेत. निवडणुकीच्या आधी दोन दिवस म्हणजेच १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता निवडणुकीचा प्रचार संपणार आहे. १९ रोजी सकाळपासून प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान यंत्र पाठवण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. प्रत्येक उमेदवाराने प्रचारासाठी आपल्या प्रतिनिधीकडून परवानगी घेणे गरजेचे आहे. प्रत्यक्ष मतदान हे २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत होणार आहे. यासाठी आवश्यक तो पोलीस बंदोबस्त तसेच इतर यंत्रणा राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.