खेड(प्रतिनिधी) दापोली विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार योगेश कदमांसह माजी आमदार संजय कदम यांच्यासह ९ जण निवडणूक रिंगणात उतरले आहेत. नावसाधर्म्य असलेल्या उमेदवारांमुळे मतदारांची फसगत होण्याच्या शक्यतेने दोन्ही दिग्गज उमेदवार सतर्क झाले आहेत.
दापोली विधानसभा मतदारसंघात २ लाख ९१ हजार २९७ मतदार आहेत. या मतदार संघात १ लाख ५१ हजार ४०२ महिला मतदार असल्याने महिलांची मते निर्णायक ठरत आहेत. मतदार संघात ३९१ मतदान केंद्रांची निश्चिती करण्यात आली आहे.
दापोली विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे आमदार योगेश कदम, महाविकास आघाडीचे संजय कदम, मनसेचे संतोष अबगुल, अपक्ष प्रवीण मर्चंडे, संजय कदम, योगेश कदम, संजय कदम, योगेश कदम, ज्ञानदेव खांबे रिंगणात आहेत. आमदार योगेश कदम यांच्यासह माजी आमदार संजय कदम यांच्या नावाशी साधर्म्य असणारे दोन उमेदवार रिंगणात असल्याने दिग्गज उमेदवारांची कसोटी लागणार आहे. या मतदार संघात १ लाख ३९ हजार ८८५ पुरूष तर १ लाख ५१ हजार ४०२ महिला मतदार आहेत. महिला मतदारांच्या सर्वाधिक संख्येमुळे महिलांची मते निर्णायक ठरणार आहेत.
या निवडणुकीत २०१ सर्व्हिस वोटर आहेत. ५ हजार ६९७ नवमतदार प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ८५ वर्षावरील ३ हजार ५६० तर १ हजार ६०९ दिव्यांग मतदार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनही सज्ज झाले असून ३९१ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.









