आधुनिकतेची कास धरत शेतकऱ्याने पिकवली देवरुखच्या लाल मातीत लाल भेंडी

 

*देवरुख (प्रतिनिधी)* आकर्ष कुमार हे नाव आज देवरुखच्या मातीशी एकरूप झाले आहे. मूळचे बिहारच्या पाटणा शहराचे असलेले आकर्ष कुमार उच्चशिक्षित आणि पुण्यात एका मोठ्या कंपनीत हुद्यावर कार्यरत होते. मात्र, पुण्यातील जीवनाची रूटीन असलेली शैली सोडून ते एका वेगळ्याच प्रेमात पडले – देवरुखच्या मातीतल्या शेतशिवाराच्या प्रेमात. त्यांनी निर्णय घेतला की, कोकणात राहून पूर्णवेळ शेती करावी आणि कोकणातील साधे, निरोगी जीवन अनुभवावे. त्यांच्या मनातला हा ठाम निर्णय त्यांना कोकणात घेऊन आला, जिथे आता ते एका आधुनिक, नैसर्गिक शेतकरी बनले आहेत.

 

कोकण म्हणजे स्वर्गच आहे, पण त्याचा खरा आनंद तो प्रत्यक्षात जगल्यावरच मिळतो. आकर्ष कुमार या मातीशी एकरूप झाले आहेत. त्यांनी ठरवले आहे की, स्वतःसाठी लागणारी प्रत्येक गोष्ट आपल्या शेतातच पिकवायची आणि ते आरोग्यसंपन्न अन्नधान्य वापरायचे. त्यांच्या शेतीचा उद्देश फक्त उत्पन्न नव्हे, तर आरोग्यसंपन्न जीवनशैली आहे. आज आकर्ष कुमार देवरुखच्या तीन ठिकाणी शेती करत आहेत. ते फक्त ऑर्गेनिक शेतीपुरते मर्यादित न राहता, त्याहून पुढे जाऊन नैसर्गिक शेतीच्या प्रयोगात मग्न आहेत. नैसर्गिक पद्धतीने बियाणे वापरणे, रासायनिक खतांपासून दूर राहणे आणि मातीची जीवंतता टिकवणे हाच त्यांचा उद्देश आहे. त्यांच्या या प्रयोगांनी आज अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा ठरली आहे.

 

सर्वसाधारणपणे कोकणातून तरुण पिढी बाहेर पडून नोकरी- व्यवसायाकडे वळताना दिसते, पण त्याच वेळी बिहारहून कोकणात आलेला युवक आपल्या नोकरीचा त्याग करून शेतीत रमला आहे, हे समीकरण थोडं वेगळं वाटतं. आकर्ष कुमार यांनी कोकणाची जी जीवनशैली आत्मसात केली आहे, तीच त्यांना या मातीशी बांधून ठेवते. आकर्ष कुमार या लाल मातीच्या प्रेमात पडले आहेत आणि विविध देशी वाण पिकवून, नैसर्गिक शेती करून त्यांची जीवनशैली आरोग्यसंपन्न केली आहे. लाल मातीतील लाल भेंडी हे त्यांचं प्रेमाचं प्रतीक आहे. त्यांच्या या प्रयोगांना इतर शेतकऱ्यांनी मार्गदर्शक मानलं पाहिजे. ते उत्पन्नापेक्षा संस्कृती आणि पद्धतीवर भर देणारे आहेत मात्र त्यांच्या प्रेरणेने कोकणातील आणि अन्यत्रील शेतकरीही देशी बियाणे वापरून नैसर्गिक शेतीकडे वळू शकतील आणि उत्पन्न घेऊ शकतील. प्रेमाची भेट म्हणून या लाल भेंडीचा सुगंध कायमच दरवळत राहील आणि देवरुखवासीय झालेल्या या आधुनिक शेतकरी आकर्ष कुमार यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.