तळेमधील त्या विदयार्थ्यांच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांचा उद्रेक

खेड(प्रतिनिधी)

तालुक्यातील तळे-कासारवाडीतील सोहम मंगेश शिर्के (१६) या किशोरवयीन विद्यार्थी चा विचूदंशानंतर झालेल्या मृत्यूने शनिवारी ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक झाला. तळेप्राथमिक आरोग्य केंद्रावर धडक देत वैद्यकीय कीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळेच युवकाचा बळी गेल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी प्रश्नांचा भडीमार केला. आरोग्य दाखल झालेल्या जिल्हा अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांनीही तेथील कार्यरत वैद्यकीयअधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले

तळे कासारवाडीतील सोहम शिर्के यास झालेल्या विंचूदंशानंतर उपचारा साठी तळे प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल करण्यात आले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार करण्यास नकारघंटा वाजवण्याचा आरोप करत खासगी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. या साऱ्या प्रक्रियेत वेळ गेल्यानंतर कुटुंबियांनी अधिक उपचारासाठी डेरवण येथील रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान युवकाचा मृत्यू झाला. युवकाच्या मृत्यूस तळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी आरोग्य केंद्रात हंगामा केला.

ग्रामस्थांच्या संतापाच्या उद्रेकानंतर वातावरण चिघळल्याने तहसीलदार सुधीर सोनावणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. खरटमोल आरोग्य केंद्रात दाखल झाले.

संतप्त जमावाने अधिकाऱ्यांना धारेवर धरत प्रश्नांचा भडीमार केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत गायकवाड यांनी संतप्त जमावाला शांततेचे आवाहन करत कायदा हातात न घेण्याचा सल्ला दिला. मात्र संतापलेले ग्रामस्थ काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. सरतेशेवटी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना आरोग्य केंद्रात पाचारण करण्याचा आग्रह ग्रामस्थांनी धरला.

यानंतर सायंकाळच्या सुमारास आरोग्य केंद्रात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठल्ये दाखल झाल्यानंतर आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कारभाराचा पाढाच वाचला.

डॉ. आठल्ये यांनीही प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांची कानउघडणी केली. युवकास उपचारासाठी खासगी रुग्णालयात का पाठवले, असा खडा सवाल उपस्थित करत नेमके काय लागेबांधे आहेत, असा प्रश्नही विचारला.

प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ तास कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून द्यावेत, निवासी डॉक्टरांची नियुक्ती करावी, बंद असलेली रुग्णवाहिका सुरू करावी, बंदावस्थेतील मशिनरीही तातडीने दुरुस्त करावी, पंचक्रोशीतील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा द्यावी आणि अशा विविध मागण्याही ग्रामस्थांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे केल्या