
पुन्हा एकदा नितेश राणे यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा
वैभववाडी येथे महायुतीचा महिला मेळावा संपन्न
वैभववाडी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी तसेच या मतदारसंघात आमदार नितेश राणे यांनी केलेले काम जनतेसमोर आहे. कामाच्या जोरावर तसेच जनतेच्या पाठिंब्यावर नितेश राणे निश्चित या निवडणुकीत विजयाची हॅट्रिक मारणार याची पूर्ण खात्री आहे. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत परत एकदा प्रचंड बहुमताने नितेश राणे यांना विजयी करा असे आवाहन सिंधुदुर्ग जिजाऊ महिला संस्थेच्या अध्यक्षा नीलमताई राणे यांनी केले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ वैभववाडी येथे महिला मेळावा संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, भाजपा प्रभारी, महिला मोर्चा संयोजका, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत, सुमेधा पाताडे, अस्मिता बांदेकर, प्राची तावडे, नेहा माईणकर, सीमा नानिवडेकर, स्नेहलता चोरगे, अक्षता डाफळे, श्रद्धा रावराणे, यामिनी वळवी, संगीता चव्हाण, सुप्रिया तांबे, सुंदरा निकम, राष्ट्रवादी महिला अध्यक्षा सौ. मुद्रस व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. यावेळी सौ. नीलमताई राणे म्हणाल्या, मागील लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे यांना आपण सर्वांनी प्रचंड बहुमताने विजयी केलात, त्याबद्दल सर्वांचे आभार. राणे साहेबांनी 40 वर्ष जिल्ह्यात काम केले. आमदार नितेश राणे देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत जिल्ह्यात काम करत आहे. पूर्ण वेळ तो जिल्ह्यातच देत आहे. नितेश राणे पक्षाच्या अनेक जबाबदाऱ्या पार पाडत आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना अंगावर घेऊन काम करत आहे. आई म्हणून मला त्याची काळजी देखील आहे.
नितेश राणे करत असलेले काम पाहून आपण त्यांना बिनविरोध दिलं पाहिजे. परंतु ठीक आहे. या निवडणुकीत ते निश्चित हॅट्रिक मारतील. आणि सर्वांच्या आशीर्वादाने महायुतीची सत्ता आली की निश्चित मंत्री होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विरोधक राणे कुटुंबावर अनेक आरोप करत आहेत. परंतु त्याला आम्ही उत्तर देत बसणार नाही. उगाच त्यांना मोठे करत बसणार नाही असेही त्यांनी सांगितले. या विधानसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी आपण फिरत आहोत. परंतु विरोधी पक्ष आहे की नाही हे दिसत नाही. कुठेतरी एक-दोन लोक गळ्यात पट्टा घालून फिरत असताना दिसतात. अशी मिश्किल टिप्पणी ही नीलमताई राणे यांनी केली.
सौ सुलक्षणा सावंत, श्वेता कोरगावकर, अस्मिता बांदेकर, यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारदा कांबळे यांनी केले. तर आभार प्राची तावडे यांनी मानले.












