खेड-दापोली मार्गावर सव्वादोन लाखांचा ऐवज जप्त

खेड (प्रतिनिधी)
खेड-दापोली मार्गावरील दीप्ती हॉटेल नजीकच्या रस्त्यावर पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने १५ हजार ३६० रुपये किंमतीचे देशी विदेशी मद्याच्या बाटल्या व रिक्षा असा २ लाख १५ हजार ३६० रुपयांचा ऐवज येथील पोलिसांनी रविवारी सायंकाळच्या सुमारास जप्त केला.
या प्रकरणी सुनील गोविंद कासारे (४५, भोलवली- मंडणगड), भांबू शिवराम कासारे (५६, दाभट -, मंडणगड) यांच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एम एच. ०८/बी. सी. १०४८ क्रमांकाच्या रिक्षातून विदेशी मद्यसाठ्याची वाहतूक करणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच येथील पोलिसांनी सापळा रचला. वरील दोघेजण रिक्षातून विदेशी मद्यसाठा घेऊन खेड येथून मंडणगडच्या दिशेने जात होते. येथील पोलिसांनी दस्तुरी फाट्याजवळील दीप्ती हॉटेलनजीक रिक्षाची झडती घेतली असता विदेशी मद्यसाठा आढळला.