चोरीच्या दुचाकीने प्रौढाला दिली धडक; प्रौढाचे निधन; चालकावर दोन गुन्हे दाखल

सहप्रवाशावरही गुन्हा दाखल 

रत्नागिरी : प्रतिनिधी

काही दिवसांपूर्वी जाकादेवी बाजारपेठेत रस्ता ओलांडणार्‍या शिवाजी कुळ्ये (50,रा.तरवळ कुळ्येवाडी,रत्नागिरी) या प्रौढाला धडक देत अपघात केल्याप्रकरणातील दुचाकी ही चोरीची असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या अपघातातील प्रौढाचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकिय रुग्णालयात मृत्यू झाला होता.

दरम्यान, या अपघातातील दुचाकी चालक श्रीराज प्रसाद सावंत (23,रा.मांजरे देसाईवाडी,संगमेश्वर) याच्यावर अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी व दुचाकी चोरी असे दोन्ही गुन्हे ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला असून दुचाकी चोरीत त्याला साथ देणार्‍या राजेंद्र राजन शिर्के (रा.मांजरे देसाईवाडी,संगमेश्वर) यावरही दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुचाकी चोरी प्रकरणी रघूनाथ सखाराम गोताड (71,रा.खालगाव जाकादेवी पोचरी फाटा,रत्नागिरी) यांनी शुक्रवार 5 ऑगस्ट रोजी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, बुधवार 3 सप्टेंबर रोजी सकाळी 7 ते दुपारी 12.30 वा.कालावधीत संशयित श्रीराज सावंत आणि राजेंद्र शिर्के या दोघांनी संगनमताने फिर्यादीची दुचाकी (एमएच-08-एल-2779) चोरुन नेली होती. त्यानंतर त्याच दिवशी दुपारी 3 वा.सुमारास संशयित श्रीराज सावंतने भरधाव वेगाने तिच चोरीची दुचाकी चालवून हा अपघात केला होता. याप्रकरणी तपास करताना ग्रामीण पोलिसांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी श्रीराज सावंत विरोधात अपघात आणि दुचाकी चोरी तर राजेंद्र शिर्के विरोधात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल केला. अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.