सरकारी यंत्रणेतील दिरंगाई रोखण्यासाठी आमसभा घेऊन अंकुश ठेवणार !

 

 

परप्रांतीय ट्रॉलर्सची घुसखोरी थांबवून स्थानिक मच्छीमाराना न्याय देऊ.

कुडाळ एमआयडीसीला संजीवनी देऊ!            निलेश नारायण राणे.

 

सिंधुनगरी l बाळ खडपकर : सी वर्ल्ड किंवा अन्य कोणतेही प्रकल्प त्या त्या भागातील जनतेला हवे असतील तरच ते आणण्याचा आपला प्रयत्न राहील. जिल्ह्यातील रोजगार वाढावा म्हणून इंडस्ट्री आपण आणू व कुडाळ एमआयडीसीला संजीवनी देऊ.परप्रांतीय ट्रॉलर्सची जिल्ह्यातील किनारपट्टीवर घुसखोरी रोखण्यासाठी जास्तीत जास्त दंडाचे धोरण करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करू. शासकीय पातळीवर नागरिकांच्या कामासाठी होत असलेली दिरंगाई रोखण्यासाठी एक वचक निर्माण करू व जनतेचे प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी आमसभेच्या माध्यमातून सर्व सरकारी यंत्रणेवर अंकुश ठेवून अशी भूमिका कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातील शिंदे सेना उमेदवार निलेश राणे यांनी मुख्यालय पत्रकारांसमोर मांडली.

 

कुडाळ मालवण मतदार संघातील मतदारांनी संधी दिल्यास पुढील पाच वर्षांत स्वखर्चातून यु पी एस सी, एम पी एस सी प्रशिक्षण केंद्र, एम बी ए इन्स्टिट्युट आणि कॅन्सर युनिट उभारणार. तसेच जिल्ह्यातील तरुण तरुणींसाठी नामवंत स्पोर्ट क्लबच्या माध्यमातून अद्यावत स्पोर्ट सुविधा उपलब्ध करणार, अशी माहिती कुडाळ मालवण विधानसभेचे महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ आयोजित “व्हिजन मतदारसंघ विकासा”चे कार्यक्रमात बोलताना दिली.

मुख्यालय पत्रकार संघाने सुरू केलेल्या व्हिजन मतदारसंघ विकासाचे कार्यक्रमांतर्गत पाचवा प्रश्नोत्तर कार्यक्रम मंगळवारी निलेश राणे यांच्यासोबत सिंधुदुर्गनगरी येथील भाजपच्या वसंत स्मृती भवन कार्यक्रमात संपन्न झाला. सुरुवातीला मुख्यालय पत्रकार संघाने पुष्पगुच्छ देवून त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी राणे यांनी मुख्यालय पत्रकार संघाने सुरू केलेला उपक्राचे कौतुक करीत या माध्यमातून मूळ आणि गरजेच्या विषयाला हात घातला आहे. पत्रकारिता एक आरसा आहे. काय चुकीचे, काय बरोबर ? हे दाखविणारी पत्रकारिता अपेक्षित आहे. तेच हेरून आपल्याशी तासभर केवळ विकासावर चर्चा झाली. त्यामुळे समाधान वाटले, असे सांगितले.

यावेळी त्यांनी कोकण रेल्वे स्वतंत्र बोर्ड असल्याने सुविधा उपलब्ध करण्यास मर्यादा येत आहेत. त्यामुळे देशाच्या रेल्वे बजेटमध्ये थेट तरतूद होत नाही. त्यामुळे ही रेल्वे थेट रेल्वे मंत्रालयाशी जोडावी, यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. त्याच बरोबर रेल्वे टर्मिनल होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. परप्रांतीय ट्रॉलर्सची घुसखोरी थांबविण्यासाठी पकडण्यात येणाऱ्या ट्रॉलरवर आठ पट दंड आकारणी करण्यासाठी अधिकारी, प्रशासनावर दबाव आणणार आहे. तरच ही अतिक्रमणे थांबणार आहेत. नद्यांचा गाळ काढण्यासाठी शासनाने निधी दिला नाहीतरी स्वखर्चातून दोन ड्रेझर उपलब्ध करून मतदार संघातील नद्यांचा गाळ काढण्यात येणार आहे, असे सांगितले.

येथील बेकारीचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आपला लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. सी वर्ल्ड आणण्याचा प्रयत्न केला त्यालाही विरोध झाला. त्यामुळे आजही बेरोजगारी जिल्ह्यात दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लोकांनी याचा विचार केला पाहिजे. सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. जमिनी दिल्या नाहीतर प्रकल्प येणार कसे ? याचा विचार करून सहकार्य केले पाहिजे. लोकांची सहमती असल्यास सी वर्ल्ड प्रकल्प आणण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच प्लॅन ए म्हणजे शेती, मासेमारी हे पारंपरिक व्यवसाय आहेत. ते आपल्याला टिकवायचे आहेत. परंतु प्लॅन बी मध्ये इंडस्ट्री येण्यासाठी सहकार्य आवश्यक आहे. तरच जिल्ह्यातील बेकरी हटून नोकरीसाठी होणारे स्थलांतर थांबेल, असे यावेळी निलेश राणे यांनी सांगितले.

जिल्ह्यात आपला भर फूड प्रोसेसिंगवर राहणार आहे. आंबा, काजू, सुपारी याच बरोबर माशांवर प्रक्रिया करणारे उद्योग निर्माण व्हावेत, असे आपल्याला वाटते. आपल्या समुद्रात ११७ प्रकारचे जागतिक ओळख असलेले व बाजारात मागणी असणारे मासे मिळतात. हा मासा जगात निर्यात होतो. त्यावर प्रक्रिया करून येथील मच्छीमारांना व्यवसाय देण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. कुडाळ एम आय डी सी आजारी पडलेली आहे. जनतेने आपल्याला संधी दिल्यास येथे उर्जावस्था आणण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे, असेही यावेळी निलेश राणे यांनी सांगितले.

 

चौकट

सिंधुदुर्गनगरी येथे खा नारायण राणे यांनी केंद्राच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र मंजूर केले आहे. यापुढे खा राणे यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग, चीपो विमानतळ आणि रेल्वे विकासासात आपल्या कार्यकाळात जास्तीतजास्त लक्ष घालावा, अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी करणार आहोत. याच बरोबर जिल्ह्यात कोणत्या प्रकारे पर्यटक जास्त येणे आवश्यक आहेत. याचा अभ्यास करून त्यासाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, असेही राणे यांनी सांगितले.

 

चौकट

कुडाळ आणि मालवण नगर पंचायत मध्ये कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. हा प्रश्न आपल्याला निकाली काढायचा आहे. जनतेने संधी दिल्यास या दोन्ही ठिकाणी महाराष्ट्रात आदर्शवत कचरा व्यवस्थापन प्रकल्प आपण उभारणार आहोत. यात केवळ नगर पंचायतीला कचरा संकलन करण्याचे काम करावे लागणार आहे. संकलित केलेल कचरा घेवून जात विल्लेवाट लावण्याचे काम दुसरी यंत्रणा करणार आहे, असे राणे यांनी यावेळी सांगितले.

 

पाच वर्षात सिंधुदुर्गनगरीचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल

सिंधुदुर्गनगरी जिल्ह्याची राजधानी आहे. या नगरीचा विकास करण्याचा प्लॅन आपल्याकडे आहे. जनतेने आपल्याला संधी दिल्यास पुढील पाच वर्षांत या नगरीचा चेहरा मोहरा बदलेला आपल्याला दिसेल. नगरपंचायत तर करणारच आहे. परंतु राजकीय ताकद वापरून नगरोत्थान मधून निधी उपलब्ध करून एक आदर्श शहर वसविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.