लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही कोकणातील महायुतीचे सर्व उमेदवार होतील विजयी : मुखमंत्री एकनाथ शिंदे

आमचं सरकार देना बँक इतरांप्रमाणे लेना बँक नाही 

आम्ही बाळासाहेबांचे व दिघे साहेबांचे शिलेदार : जो शब्द देतो तो पाळतो 

कोकणातील बॅकलॉग भरून काढण्यासाठी कोकण विकास प्राधिकरण

लाडक्या बहिणींच्या योजनेत खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना जोडा दाखवा 

विजयाचा चौकार मारून केसरकर सावंतवाडीचा कप जिंकतील 

सीएम म्हणजे कॉमन मॅन 

सावंतवाडी । प्रतिनिधी :
कोकणी माणूस काटेरी असला तरी गोड गऱ्यासारखा आहे. कोकण आणि बाळासाहेब असं समीकरण आहे. कोकणी माणसावर त्यांनी भरभरून प्रेम केले. नारायण राणे यांनी त्या काळात बाळासाहेबांचे विचार घराघरात पोहचवले. मात्र बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना कोकणी माणसाने नाकारलं. लोकसभेत इथल्या लोकांनी नारायण राणेंना भरघोस मतांनी निवडून दिलं. केसरकर आणि राणे एकत्र आलेत हा विजयाचा शुभशकून आहे. दीपक केसरकर यांच्या हातात पुन्हा धनुष्यबाण आला आहे. केसरकर म्हणजे ऑल राउंडर सचिन तेंडुलकर आहेत. विजयाचा चौकार मारून सावंतवाडीचा कप ते निश्चितच उचलतील, असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.


सावंतवाडी येथे महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे, माजी खासदार तथा कुडाळचे महायुतीचे उमेदवार निलेश राणे, शिवसेनेचे उपनेते संजय आंग्रे, केरळ राज्याचे प्रमुख ॲड. हरी कुमार, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा संघटक संजू परब, राष्ट्रवादीचे काका कुडाळकर, युवराज लखमराजे भोसले, महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता कविटकर, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरेगावकर, सुरेश गवस, रमाकांत जाधव, संदीप कुडतरकर, महेश सारंग, रवी मडगावकर, अजय गोंदावळे, सौ. पल्लवी केसरकर, बाबू कुडतरकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.


बाळासाहेबांच्या विचारांशी बेइमानी करणाऱ्यांशी अनैसर्गिक आघाडी करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले. धनुष्यबाण कॉग्रेसच्या दावणीला बांधला. त्यावेळी मी उठाव केला. सत्तेचा त्याग केला. केसरकर यांनी त्यावेळी मला खांद्याला खांदा लावून साथ दिली. दिलेली जबाबदारी त्यांनी पूर्ण केली. माझ्यासाठी ते फायर फायटर सारखे आहेत. सावंतवाडीच्या जनतेचे त्यांच्यावर प्रेम आहे. चक्रव्यूह कसा भेदायचा हे त्यांना ठाऊक आहे. त्यांचा अभिमन्यू होणार नाही व ते निश्चितच चक्रव्यूह भेदतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
लाडक्या बहिणींना वंचित ठेवणार नाही. सरकार आल्यानंतर लगेचच सगळ्या लाडक्या बहीणांना योजनेचा लाभ मिळेल. आमचं सरकार देणार आहे. लेना बँक प्रकार आमचा नाही. हप्ते घेणारं जेलमध्ये जाणारं हे सरकार नाही. विरोधक सावत्र भाऊ बनून आडवे येतील म्हणून नोव्हेंबरचा निधी ऑक्टोबरलाच दिला. दिला शब्द पाळणारी आम्ही लोक आहोत. बाळासाहेब व दीघेसाहेबांचे आम्ही शिलेदार आहोत. त्यामुळे जो शब्द देतो तो पाळतो. त्यामुळे आमचे सरकार आल्यानंतर ज्या ज्या योजना सुरू केल्या आहेत त्या सर्व सुरूच ठेवणार, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.
कोल्हापूर येथील महालक्ष्मीला साक्षी ठेवून आम्ही महायुतीचा वचननामा सादर केला. लाडक्या बहिणींना २१०० रूपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी, ५० हजार महिलांची पोलिस भरती आम्ही करत आहोत. ज्येष्ठ तसेच विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय आम्ही घेतलेत‌. ४ लाख लोकांना जर्मनीत नोकऱ्या देण्यात दीपक केसरकर यांचा मोठा वाटा आहे. अनेक धोरणात्मक निर्णय आम्ही घेतले आहेत. शेतकऱ्यांच वीजबिल माफ, घरगुती बिलांत ३० टक्के मुभा दिली आहे‌. आम्ही अडीच वर्षांत सगळं सुरू केलं, स्थगिती उठवली. महाविकास आघाडीन केवळ बंद करण्याचे काम केलं. लाडकी बहीणची चौकशी लावू असे म्हणाले. त्यामुळे अशा सावत्र भावांना तुम्ही साथ देणार नाही हा मला विश्वास आहे असे ते म्हणाले.


एकनाथ शिंदे संघर्षातून पुढे आलाय. जेलमध्ये टाकायच्या धमक्या मला देऊ नका. मला हलक्यात घेऊ नका. हलक्यात घेतलात म्हणून तुमचा टांगा पलटी करून सर्वसामान्य माणसांच्या मनातल सरकार आम्ही आणलं. हिताच्या योजना सुरू केल्या. आमचं सरकार आल नसतं तर या योजना सुरू झाल्या नसत्या.पैशात लोळणाऱ्यांना गरीबीची झळ कळणार नाही. लाडक्या बहिणींच्या योजनेत खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना जोडा दाखविल्याशिवाय राहू नका, असे आवाहन त्यांनी केले.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचा सर्वांगीण विकास केला. केंद्रात आपलं सरकार आहे. त्यामुळे माझी लाडकी बहीण, शेतकरी, ज्येष्ठ, व बंधू महायुतीचे उमेदवार विजयी करतील असा विश्वास व्यक्त करत निवडणूका झाल्यानंतर गळ्यात कॅमेरा अडकवून ठाकरेंना जंगलात पाठवा, असा टोला त्यांनी लगावला.

दीपक केसरकर यांनी कोट्यावधीची विधायक काम केली. पर्यटनाला आपण चालना देत आहोत. कोकण एक्स्प्रेस, महामार्गाला चालना देत आहोत. कोकणातील बॅकलॉग भरून काढण्यासाठी कोकण विकास प्राधिकरण आपण निर्माण केल आहे. त्यामुळे कोकणातील सर्व आमदार हे महायुतीचे असतील असा विश्वास व्यक्त केला. पावसानं देखील आशीर्वाद दिल्यानं आपला विजय पक्का आहे. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी नितेश राणे, निलेश राणे आणि दीपक केसरकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.