खेड(प्रतिनिधी) खेड बसस्थानकातील जुनाट झालेल्या छताचे काम अखेर पूर्ण झाले आहे. आगारप्रमुख रणजित राजेशिर्के यांच्या पाठपुराव्यानंतर वरिष्ठ एसटी प्रशासनाने छताच्या डागडुजीसाठी निधीची उपलब्धतता करून दिली. त्यानुसार स्थानकातील छतावरील जुनाट पत्रे बदलून त्याठिकाणी नवीन पत्रे बसवण्यात आले. अंतर्गत कामांनी देखील वेग घेतला आहे. येथील उभारणीपासून देखभाल दुरुस्तीकडे एसटी प्रशासनाने कानाडोळा केला होता. दुरूस्तीसाठी येथील एसटी स्थानका च्या प्रशासनाने वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव पाठवून सतत पाठपुरावा करून देखील त्यांच्या पदरी अपयश आले होते. यामुळे बसस्थानकाची अवस्था बिकट झाली होती. छतावरील जुनाट पत्रे कधीही कोसळण्याच्या स्थितीत होते. याशिवाय काही पत्र्यांमधून पावसाळ्यात बसस्थानकात पाणीही झिरपत होते.
अखेर एसटी प्रशासनाला दीपावली सुट्टीच्या मुहूर्तावर छताच्या दुरुस्तीसाठी मुहूर्त मिळाला. यासाठी आगारप्रमुख रणजित राजेशिर्के यांनी सातत्याने पाठपुरावा करत दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून घेतला. लवकरच छताच्या दुरुस्तीचे काम करण्याचे संकेत देखील दिले होते. त्यानुसार छताच्या दुरूस्तीचे काम पूर्ण झाले आहे. बसस्थानकातील विद्युतीकरणासह अंतर्गत कामे देखील वेगाने सुरू आहेत. बसस्थानकात जागोजागी पडलेले खड्डे बुजवून मार्ग सुस्थितीत आणण्याचे काम देखील लवकरच हाती घेण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.










