उद्धव ठाकरे यांचे नाते केवळ ‘खुर्ची’शी : शितल म्हात्रे

आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार

सहानुभूतीवर नाही तर कामावर मतं मिळतात

लाडक्या बहिणीच महायुतीला पुन्हा सत्तेत आणतील

सावंतवाडी । प्रतिनिधी :
उद्धव ठाकरे हे कोणतीच नाती जपत नाहीत. ना त्यांनी शिवसैनिकांचे नाते जपले ना भाऊबंदकीचे. त्यांना फक्त खुर्चीचे नाते मान्य आहे आणि ते केवळ त्याच्यासाठीच काम करतात, अशी टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या माजी नगरसेविका शितल म्हात्रे यांनी केली. सावंतवाडी येथे पत्रकारांशी संवाद त्यांनी संवाद साधला.
हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे अख्या महाराष्ट्राचे बाप आहेत. आम्ही सर्वजण त्यांना वडिलांसमान मानतो. त्यामुळे तुम्ही जरी त्यांच्या प्रॉपर्टीचे वारसदार असलात तरी त्यांच्या विचारांचे खरे वारसदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सोबत असलेले सर्व शिवसैनिक आहेत. हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे पूर्ण नाव घेण्याची आज त्यांच्यामध्ये हिम्मत राहिली नाही. एवढेच काय तर मव्याच्या कुठच्याही बैठकीत ते डोक्यावर टिळा लावून जात नाहीत. त्यामुळे त्यांचे दाखवायचे दात वेगळे आहेत अशी सडकून टीका त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
उबाठाला दुसऱ्यांवर बोट दाखवण्यात अलीकडे कोणतेही काम नाही. ते विकासावर कधीही बोलत नाहीत त्यांच्या भाषणात केवळ खंजीर कोथळा गद्दारी खोके याच्याशिवाय काहीही नसते. आता जनतेला हे कळू लागले आहे. सहानुभूतीवर मतं मिळत नाही तर कामावर मतं मिळतात. त्यामुळे आम्हाला त्यांनी काहीही बोलले तरी आम्ही नेहमी त्यांना कामातून उत्तर दिले आहे व यापुढेही कामातूनच उत्तर देऊ. आम्ही केवळ बोलत नाही तर करून दाखवलं आहे. त्यामुळे याच कामाच्या जोरावर राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता स्थापन होईल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सावंतवाडी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे केवळ तळकोकणाचे नेते नसून ते संपूर्ण महाराष्ट्राचे नेते आहेत.
त्यांचे कामच एवढे आहे की मला वाटत नाही की त्यांना प्रचाराची गरज आहे. प्रत्येक घरातील माणूस त्यांना आपलं मानतो व रस्त्यावरील प्रत्येक माणसाला त्यांनी केलेलं काम माहित आहे. त्यामुळे शांत संयमी व काम करणारी व्यक्तीच लोकांना हवी असते आणि याच मुद्द्यावर दीपक केसरकर हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सत्ता बदलाच्या वेळी दीपक केसरकर यांनी शिवसेनेचे प्रवक्ते या नात्याने शिवसेनेची भूमिका जनतेपर्यंत पोहोचविण्याचे फार मोठे काम केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील त्यांनी खूप मोठे सहकार्य केले आहे. त्यामुळे महायुतीच्या विजयात त्यांचा पुन्हा एकदा मोलाचा सहभाग राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ सावंतवाडी दौऱ्यावर असलेल्या शितल मात्रे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्नुषा वृषाली शिंदे, मंत्री दीपक केसरकर, सोनाली केसरकर, महिला आघाडी प्रमुख ॲड. निता गावडे यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.