खेड(प्रतिनिधी) खेड बसस्थानकातील उपहारगृहाला लागलेले कुलूप अजूनही कायम आहे. पूर्वीच्या ठेकेदाराने बिल थकवल्याने उपहारगृहाला कुलूप लावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. बंदावस्थेतील उपगृहामुळे एसटी बसच्या वाहनचालकांसह प्रवाशांची हेळसांड सुरू आहे. उपहारगृह नेमके कधी खुले होईल, याची हमी दस्तुरखुद्द एसटी प्रशासनही देवू शकत नसल्याने प्रवाशांना उपगृह खुले होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
गेल्या दीड वर्षापासून उपहारगृहाला टाळे ठोकण्यात आले आहे. उपहारगृहाअभावी लांबपल्ल्याच्या ठिकाणाहून पहाटेच्या सुमारास येथील स्थानकात येणाऱ्या प्रवाशांची परवड सुरू आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ ही बिरुदावली मिरवणाऱ्या एसटी प्रशासनाच्या गलथान कारभाराचा प्रवाशांना
पूर्वीच्या ठेकेदाराने बिल थकवल्याचा फटका बसत आहे. उपहारगृह बंद असल्याने प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गणेशोत्सवात उपहारगृहाच्या बाहेर तात्पुरत्या स्वरुपात बचतगटाला चहा-नाष्ट्याची व्यवस्था करण्याची मुभा देण्यात आली होती. यामुळे काहीअंशी गणेशभक्तांची सोय झाली होती.
मात्र सद्यस्थितीत तात्पुरत्या स्वरुपातील बचतगटाने थाटलेले चहा-नाष्ट्याचे दुकानही गायब झाले आहे. यामुळे प्रवाशांसह वाहनचालकांची गैरसोय होत आहे. पूर्वीच्या ठेकेदाराने थकवलेले भाडे वसूल करण्याची जबाबदारी येथील एसटी प्रशासनाची असतानाही त्याकडे केलेल्या दुर्लक्षाचा फटका प्रवाशांना बसत आहे. यामुळे एसटी प्रशासन उपहारगृह खुले करण्याची तसदी घेणार तरी कधी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.











