महामार्गाची वर्षअखेरची नवी ‘डेडलाईन’ हुकण्याची शक्यता

 
खेड(प्रतिनिधी) मागील १३ वर्षांपासून सुरू असलेल्या मुंबई- गोवा महामार्गाचे काम अजूनही सवगतीनेच सुरू आहे. विधानसभा निवडणुकीमुळे महामार्गाच्या कामाकडे पूर्णतः दुर्लक्षच झाले आहे. यामुळे महामार्गाच्या पूर्णत्वाची वर्षअखेरची देण्यात आलेली नवी ‘डेडलाइन ही हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 सर्वास्थितीत विकट मार्गातूनच वाहनचालकांना खडतर प्रवास करावा लागत आहे. महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण होणार कधी अन् ‘डेडलाईन नेमक्या थांबणार कधी, या सर्व प्रश्नांनी कोकणवासियांना भंडावून सोडले आहे.
पनवेल ते झाराप पत्रादेवी या ४५० कि.मी. लांबीच्या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामास २०११ मध्ये सुरुवात झाली. ११ टप्प्यांतील कामापैकी ५० टप्प्यांची म्हणजेच ८४ कि.मी. अंतरापर्यंतची जबाबदारी राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. तर ० ते ८४ कि.मी. म्हणजेच पनवेल ते इंदापूर या टप्प्यातील चौपदरीकरणाची जबाबदारी केंद्र सरकारच्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर आहे. या महामार्गाचे काम सवगतीने होत असल्याची न्यायालयाने गंभीर दखल घेत ताशेरेही ओढले होते. न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर ३१ जानेवारी २०२० पर्यंत काम पूर्ण करण्याची लेखी हमी राज्य सरकार न्यायालयात दिली होती. ही हमीही केंद्र व राज्य सरकारला पाळता आलेली नाही.
लेखी हमीचे पालन करता न आल्याने मुदत वाढवून मिळण्यासाठी दोन्ही प्रशासनाने न्यायालयात रितसर अर्जही केला होता. उच्च न्यायालयाने ५ जुलै २०२३ रोजी दोन्ही प्रशासनाला प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंडही लावला होता. प्रकल्पपूर्तीबाबतची स्वतःचीच हमी अनेकदा पाळली नसल्याने तो न्यायालयाचा अवमान असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले होते.
६ मार्च व १६ सप्टेंबर २०२२ रोजीच्या सरकारच्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे ३१ डिसेंबर  वर्षअखेरची ‘डेडलाईन’ देण्यात येत आहे. मात्र, या साऱ्या डेडलाईनवर पाणी फिरत आहे. सद्यस्थितीतील कामाची दयनीय स्थिती पाहता वर्षअखेरीस काम कितपत पूर्ण होईल, हा यक्षप्रश्न आहे, असे कोकण विकास समिती संस्थापक अध्यक्ष जयवंत दरेकर यांनी सांगितले.
२०२३ ही ‘डेडलाईन’ देण्यात आली होती. मात्र, ही ‘डेडलाईनही हवेतच विरल्याने पुन्हा २१ डिसेंबर २०२ रोजी दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार पुन्हा ३१ डिसेंबर २०२४ ची डेडलाईन देण्यात आली आहे. महामार्गाच्या ८४ किलोमीटर अंतराच्या कामावर गेल्या १३ वर्षात १५६४ कोटी रूपयांचा चुराडा करूनही अजूनही कामे अपूर्णावस्थेतच आहेत. अपूर्णावस्थेतील कामामुळे वाहनचालकांची वर्षानुवर्षाची सुरू असलेली कसरत अजूनही कायमच आहे. जागोजागी पडलेले खडे अन् अर्धवट स्थितीतील कामांमुळे महामार्गावरील विकट मार्गातून वाहनचालकांचा जीवघेणा प्रवासच सुरू आहे.
आजवर कोट्यवधी रुपयांच्या निधीचा चुराडा करूनही महामार्गाची कामेच अपूर्ण असल्याने मनस्ताप कायमच राहिला आहे. वर्षानुवर्षे वर्षअखेरीसच्या महामार्ग पूर्णत्वाच्या ‘डेडलाईन देण्यात येत आहे. मात्र आतापर्यंत देण्यात आलेल्या सर्व ‘डेडलाईन’ हवेतच विरल्या आहेत. डिसेंबर २०२४ अखेरची नवी ‘डेडलाईन’ देण्यात आली आहे. सद्यस्थितीतील कामाची गती पाहता वर्षअखेरीस महामार्गाचे काम पूर्ण होण्याची शक्यता धुसरच बनली आहे. यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रीय महामार्ग खात्याला नवी ‘डेडलाईन’ द्यावी लागतेय की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.